Wed, Mar 27, 2019 00:05होमपेज › Solapur › सोलापूर जिल्ह्यातील 42 गावे झाली गटारमुक्‍त

सोलापूर जिल्ह्यातील 42 गावे झाली गटारमुक्‍त

Published On: Jul 01 2018 12:11AM | Last Updated: Jul 01 2018 12:00AMसोलापूर : तिनिधी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या पुढाकारामुळे सोलापूर जिल्ह्यातील 118 ग्रामपंचायतींचा कारभार पेपरलेस  झाला असून, ग्रामीण भागही डिजिटल युगाकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय 42 गावेही गटारमुक्‍त झाल्याने या गावांना स्वच्छ व निरोगी वातावरण लाभले आहे. 

गटारमुक्‍त झालेल्या 28 गावांतील सरपंच व ग्रामसेवकांचा गौरव नुकताच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. गटारमुक्‍त गावांची संख्या रोजच वाढत असून, आतापर्यंत 42 गावे गटारमुक्‍त झाली आहेत. जिल्ह्यातील 1 हजार 29 ग्रामपंचायतींसाठी जिल्हा परिषदेने 74 हजार 598 शोषखड्डे गटारमुक्‍तीसाठी उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. यापैकी 22 हजार 319 शोषखड्डे पूर्ण करण्यात आले आहेत. जिल्हाभरातील किमान 200 गावे गटारमुक्‍त करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. पंचायत समिती पदाधिकारी सरपंच व ग्रामसेवक यांच्या सहकार्यातून गटारमुक्‍त गाव संकल्पना उदयास आणली जात आहे. 

आतापर्यंत अक्‍कलकोट तालुक्यात 4, बार्शी तालुक्यात 9, करमाळा तालुक्यात 1, माढा तालुक्यात 5, माळशिरस तालुक्यात 3, मंगळवेढा तालुक्यात 6, मोहोळ तालुक्यात 2, पंढरपूर तालुक्यात 1, सांगोला तालुक्यात 1, उत्तर सोलापूर तालुक्यात 9, तर दक्षिण सोलापूर तालुक्यात 1 ग्रामपंचायत गटामुक्‍त झाली आहे. या गावांतील 46 हजार 492 कुटुंबे 28 हजार 68 बंदिस्त गटारीशी जोडण्यात आली आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींचा कारभारही डिजिटल करुन पेपरलेस करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत 118 ग्रामपंचायतींचा कारभार पेपरलेस झाला असून ग्रामपंचायतीमधील 1 ते 33 नोंदवह्या या कागदविरहित झाल्याने नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा मिळत आहेत.