Sat, Jul 20, 2019 15:01होमपेज › Solapur › तीन अपघातांत चार ठार

तीन अपघातांत चार ठार

Published On: Feb 04 2018 1:58AM | Last Updated: Feb 03 2018 11:00PMकेज/अंबासाखर ः प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत चारजण ठार झाले आहेत. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा देऊन परतणार्‍या विद्यार्थ्याच्या मोटारसायकलला टेम्पोने धडक दिल्याने अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अंबाजोगाईजवळ मोटारसायकलच्या धडकेत माय-लेकीचा, तर बीड बायपासवर झालेल्या दोन ट्रकच्या अपघातात क्‍लीनरचा मृत्यू झाला.
अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयासमोर झालेल्या अपघातात शालिनी राजेंद्र बत्तीशे (वय 32) आणि त्यांची मुलगी प्रियांका (12, रा. मोरेवाडी) या दोघी ठार झाल्या. दुसर्‍यांच्या घरी धुणीभांडी करून त्या आपली गुजराण करत होत्या. कृषी महाविद्यालासमोरून त्या जात असताना समोरून अतिशय वेगाने येणार्‍या दुचाकीस्वार तरुणांनी त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात माय-लेकीच्या डोक्याला गंभीर इजा होऊन त्या जागेवरच बेशुद्ध झाल्या. त्या ठिकाणी उपस्थित लोकांनी तातडीने दोघींना उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. रात्री 11.30 वाजता शालिनी बत्तीशे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर प्रियांका मध्यरात्री 2.30 वाजता मरण पावली. शालिनी आणि प्रियांका यांच्या मृत्यूनंतर आता घरात केवळ शालिनी यांचा तरुण मुलगा राहिला आहे. शालिनी यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. अत्यंत हलाखीची परिस्थिती असणार्‍या कुटुंबावर एकापाठोपाठ एक संकटे कोसळल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे.

दुसरा अपघात बीड बायपासवर

 झाला. धारूरकडून धुळ्याकडे जाणार्‍या ट्रकला (एमएच 16 क्यू 7507) ला समोरून येणार्‍या ट्रकने (आरजे 20 जीबी 4172)  जोराची धडक दिली. या अपघातात क्लिनर गोगा कांबळे (वय 30, रा. केज) ठार झाला, तर चालक शेख लतीफ शेख उस्मान (रा. मस्साजोग, ता. केज) हा गंभीर जखमी झाला. बीड येथील शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

तिसरा अपघात नेकनूर-केज रस्त्यावर बरड फाटा येथे घडला. केज तालुक्यातील नांदूरफाटा येथील विकास अशोक ठोंबरे (वय 18) हा सारणी सांगवी येथील महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. प्रात्यक्षिक परीक्षा दिल्यानंतर मोटारसायकल  (एमएच 23 आर 4804) वरून तो सारणी सांगवी येथून नांदूरफाट्याकडे निघाला होता. त्याचवेळी टेम्पोने (एमएच 23 7508) मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात विकास ठोंबरे हा जागीच ठार झाला. विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत आहे.