Wed, May 22, 2019 14:29होमपेज › Solapur › तांडोर येथे वाळू उपसा करणारी 39 वाहने जप्त

तांडोर येथे वाळू उपसा करणारी 39 वाहने जप्त

Published On: Mar 11 2018 11:23PM | Last Updated: Mar 11 2018 11:23PMमंगळवेढा  : तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील भीमा नदीतून पहाटेच्या सुमारास तांडोर येथे चोरून वाळू उपसा करणारी 39 वाहने, 22 मजूर, वाहनचालक आणि 100 ब्रासपेक्षा जास्त वाळू पोलिसांनी जप्त केली. तीन कोटींहून अधिक माल रविवारी पहाटे जप्‍त करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात आजवर वाळू तस्करांवर झालेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. 

दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहने वाळू उपसा करीत असतील आणि जिल्हा पोलिसप्रमुखांचे पथक येऊन कारवाई करीत असेल, तर मंगळवेढा महसूल आणि स्थानिक पोलिसांनाही याची खबर का लागली नाही, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.  पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या पथकाने तांडोर येथील भीमा नदीतून  सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर पहाटे छापा टाकला. यावेळी 20 ट्रॅक्टर, 3 जे.सी.बी.  7 ट्रक, 8 मोटार सायकल, 1 बोलेरो जीप अशी 39 वाहने   जप्त केली. त्याचबरोबर एकूण अंदाजे 100 ब्रास पेक्षा जास्त वाळू जप्त करण्यात आली आहे. ही एकंदरीत सर्व मालमत्ता तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.  मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर, बोराळे, तांडोर या भागातून नेहमीच  अवैध वाळू उपसा चालू   असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशीच माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक एस. विरेश प्रभू यांच्या विशेष पथकाने खासगी वाहनातून वेषांतर करून रविवार ( दि. 11 मार्च )  पहाटेच तांडोर येथे धडक मारली. पहाटेचा सुमार असल्यामुळे आणि नागरी  वेषात पोलिस असल्यामुळे वाळू उपसा करणार्‍यांना याची खबर लागली नाही.  मात्र पोलिस असल्याचे लक्षात येताच नदीपात्रातील वाळूने भरलेले 20 ट्रॅक्टर, 7 ट्रक व 3 जे.सी.बी, 8 मोटार सायकली, 1 बोलेरो जीप नदीपात्रात सोडून पळून  जात उसाचा आसरा घेतला.

दरम्यान, वाळू उपसा करणार्‍या जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रकच्या चालक, मजुरांसह 22 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्व वाहनांसह ताब्यात घेतलेल्या लोकांना तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले.  

महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत वाळूची मोजदाद आणि मुल्यांकन करीत होते. तसेच वाहनांची कागदपत्रे तपासून त्यांचे पंचनामे करण्याची आणि गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत चालूच होती.  सर्व वाहने, आणि वाळूसह सुमारे 3 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असल्याचे प्राथमिक अहवालावरून सांगितले जाते. 

सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठ-दहा महिन्यांपासून वाळू उपसा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे चोरून वाळू उपसा करण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिस आणि महसूल विभागाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी या वाळू तस्करांवर कारवाया केल्या असल्या तरी रविवारी पहाटेची कारवाई ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे.  या धडक कारवाईने अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू माफीयांचे धाबे दणाणले आहेत.