Tue, Apr 23, 2019 19:56होमपेज › Solapur › बाजार समितीत 39 कोटींचा अपहार

बाजार समितीत 39 कोटींचा अपहार

Published On: May 21 2018 11:14PM | Last Updated: May 21 2018 11:06PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीमध्ये  संचालक  मंडळाने 39 कोटी 6 लाख 93  हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी विशेष लेखापरीक्षकाने जेलरोड पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल  केला असून या तक्रार अर्जाचा अभ्यास करण्याचे काम पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडित काकडे यांनी हा तक्रारी अर्ज पोलिसांकडे दिला आहे. सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ आणि सचिवांनी मिळून 1 एप्रिल 2011 ते 31 मार्च 2016 या कालावधीत गैरव्यवहार केल्याचे तक्रार अर्जामध्ये म्हणण्यात आले आहे. संचालक मंडळ व सचिवांनी बाजार समितीच्या ठेवी या बाजार समितीला फायदा होईल अशा ठिकाणी गुंतविल्या नाहीत, बाजार समितीमध्ये बांधकाम हे ठेकेदाराने मुदतीत पूर्ण केले नाही, त्यामुळे ठेकेदाराकडून कसलाही दंड केला नाही, बाजार समितीमध्ये हंगामी किंवा कायम कर्मचार्‍यांची भरती करताना नियुक्‍ती करता येत नसताना नियुक्त्या केल्या अशा विविध 14 मुद्द्यांद्वारे संचालक मंडळाने गैरव्यवहार केल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. 

1 एप्रिल 2011 ते 17 ऑक्टोबर 2011 या कालावधीत 14 समिती सदस्य व 1 सचिव यांनी तसेच 18 ऑक्टोबर  2011 ते 31 मार्च 2016 या कालावधीत 20 समिती सदस्य व 2 सचिवांनी मिळून हा गैरव्यवहार केल्याचेही विशेष लेखापरिक्षकांनी नमूद केल्याचे पोलिस उपायुक्‍त अपर्णा गिते यांनी सांगितले.  या तक्रारी अर्जाचा अभ्यास पोलिस विभागाकडून करण्यात येत असून पूर्ण अभ्यासाअंती याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचेही उपायुक्‍त गिते यांनी सांगितले.