Mon, Jul 22, 2019 02:47होमपेज › Solapur › साडी व्यापार्‍याची 38 लाखांची फसवणूक

साडी व्यापार्‍याची 38 लाखांची फसवणूक

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 12 2018 10:02PMसोलापूर : प्रतिनिधी

पाच वर्षे साड्या घेवून, व्यवहार करुन तब्बल सहा बाउन्स चेक देवून सोलापूरच्या एका साडी व्यापार्‍याची तब्बल 38 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील सांगवी येथे राहणार्‍या एकावर जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यात साडी व्यापारी पुरुषोत्तम रामकिसन धूत (वय 56, रा. महेश हौसिंग सोसायटी, बुधवार पेठ, सोलापूर) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन दीपक किसन जवळकर (रा. सांगवी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला. 

फिर्यादीमध्ये मार्च 2014 ते आजतागायतपर्यंत फसवणूक करण्यात आल्याचे म्हटले आहे. आरोपीने फिर्यादीकडून 38 लाख रुपयांच्या साड्या घेवून जावून त्या बदल्यात 33 लाख 32 हजार 855 रुपयांचे कोटक महिंद्रा बँक व जळगाव पिपल्स को. ऑप. बँकेचे चेक दिले. मात्र खात्यातमध्ये पुरेशी रक्‍कम नसताना किंवा चेक क्‍लियरन्स करण्याच्या तारखेस रक्‍कम येणार नाही हे माहीत असताना केवळ फसवणूक करण्याच्या उद्देशाने फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

विविध तारखेचे सहा चेक देवूनही ते बाउन्स होत असल्याने फिर्यादीने आरोपीस फोनवर संपर्क साधला असता यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. पैसे देत नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणून शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक साळुंखे करीत आहेत.  

साडी व्यापारी धूत यांनी गुन्हे शाखेत 25 जानेवारी 2018 रोजी फसवणूक झाल्याची तक्रारी अर्ज दाखल केला होता. या अर्जाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेने केली. यात आरोपी दीपक किसन जवळकर यांनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.