Mon, Apr 22, 2019 04:03होमपेज › Solapur › रेल्वेगेट बंद करण्यासाठी सोलापूर डिव्हिजनला 38 कोटींचा निधी

रेल्वेगेट बंद करण्यासाठी सोलापूर डिव्हिजनला 38 कोटींचा निधी

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 30 2018 10:43PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर डिव्हिजनमधील रेल्वे फाटक किंवा रेल्वेगेट बंद करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून 38 कोटींचा निधी मिळाला असून मध्य रेल्वेमध्ये येणार्‍या पाचही डिव्हिजनला 130 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून आला आहे.परंतु लातूरमध्ये एका रेल्वे फाटकास बंद करण्यास रेल्वे प्रशासनाची दमछाक होत आहे. रेल्वे प्रशासन रोड अंडर ब्रिज (आरयूबी-भुयारी मार्ग)करण्याच्या विचाराधीन आहे, परंतु यास ग्रामस्थांकडून विरोध होत आहे.

भारतामध्ये गेल्या पाच वर्षांपासून 278 पेक्षा अधिक अपघात रेल्वे फाटकांवर झाले  आहेत. यामध्ये आजतागायत 322 लोकांनी  आपले प्राण गमावले आहेत व 340 लोक जखमी झाले आहेत.
रेल्वे प्रशासन देशातील ही रेल्वे फाटके पूर्णत: बंद करण्याच्या तयारीत आहे. रेल्वे प्रशासनाने 2020-2021 पर्यंत देशातील सर्व रेल्वेगेट बंद करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. रेल्वेमंत्र्यांनी 2018-2019 याकाळात रेल्वेगेट बंद करण्यासाठी विशेष निधी राखीव ठेवण्यात आला आहे. सोलापूर डिव्हिजनमधील रेल्वेगेट बंद करण्यासाठी 38 कोटींचा निधी मिळणार आहे.

लातूर येथील रेल्वेगेट क्र. 49
लातूर जिल्ह्यातील गेट क्र. 49 वरुन वाहनांची ये-जा करण्याची एकूण संख्या 7542 एवढी आहे. येथील ग्रामस्थांना पलीकडे जाण्यासाठी मेल, एक्स्प्रेस किंवा रेल्वे मालगाडी जाताना गेटवर थांबावे लागत आहे.रेल्वे प्रशासनाने हे रेल्वेगेट बंद करुन  त्याऐवजी भुयारी मार्ग सुरु करण्याचा प्रयत्न केला असता त्याला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. येथील कामकाज लवकरात लवकर चालू करण्यासाठी रेल्वे प्रशासन लातूर येथील जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत आहे.

भविष्यात देशातील सर्व रेल्वेगेट बंद होणार
भविष्यात भारतामधील सर्व रेल्वेगेट बंद करण्यासाठी रेल्वे मंत्रालय युध्दपातळीवर कार्य करत आहे. मध्य रेल्वेच्या 5 डिव्हिजनसाठी 130 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सोलापूर डिव्हिजनला 38 कोटी मिळाले आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये देशामध्ये आजपर्यंत 278 अपघात झाले असून 322 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.