होमपेज › Solapur › ३५ भाऊसाहेबांना पदोन्‍नतीचा लाभ

३५ भाऊसाहेबांना पदोन्‍नतीचा लाभ

Published On: Mar 07 2018 11:19PM | Last Updated: Mar 07 2018 9:34PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतीत कार्यरत असणार्‍या ग्रामसेवक अर्थात 35 भाऊसाहेबांना दर बारा वर्षांनंतर देण्यात येणार्‍या आश्‍वासित सेवा पदोन्‍नतीचा लाभ जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिला आहे. त्यामुळे या भाऊसाहेबांची रंगपंचमी दिवाळीसारखी ठरली आहे. प्रगती आश्‍वासित लाभ दिलेल्या भाऊसाहेबांना एकत्रित दरमहा 35 हजार रुपयांचे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

जिल्हा परिषदेच्या योजना खालच्या पातळीवर राबविण्याची खरी जबाबदारी ग्रामसेवकांवर असते. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गत वर्षभरात भाऊसाहेबांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात त्यांनी यश मिळवले आहे. भाऊसाहेबांच्या योगदानामुळेच स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान आवास योजना यासारख्या महत्त्वाच्या योजनात सोलापूर राज्यात अव्वल ठरला गेला आहे. 

ग्रामसेवक संघटनेच्या वतीने पदोन्‍नतीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. नियमाने पदोन्‍नतीसाठी जे ग्रामसेवक पात्र आहेत, अशा ग्रामसेवकांना पदोन्‍नतीचा लाभ देण्याचा तातडीचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारुड यांनी घेतला. त्यामुळेच 35 ग्रामसेवकांना पदोन्‍नती व वेतनवाढ मिळाली गेली आहे. 

ग्रामसेवकांच्या मागणीप्रमाणे त्यांच्या मागण्या डॉ. भारुड यांनी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे ग्रामसेवक भाऊसाहेबांचा कामातील उत्साह आणखीन वाढण्याची अपेक्षा व्यक्‍त होत आहे. 

एकाच भाऊसाहेबांकडे अनेक गावाचा कारभार अपुर्‍या पदसंख्येमुळे सोपविण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक भाऊसाहेब दोन्ही गावात उपस्थित न राहता तिसरीकडेच उपस्थित राहत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. त्यामुळे भाऊसाहेबांनी ठरलेल्या दिवशी ठरलेल्या गावात हजर रहावे, इतकीच माफक अपेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांतून व्यक्‍त होत आहे.