Wed, May 22, 2019 23:02होमपेज › Solapur › मृत घोषित केलेला जिवंत झाला!

मृत घोषित केलेला जिवंत झाला!

Published On: Jul 14 2018 12:57AM | Last Updated: Jul 14 2018 12:57AMसोलापूर : प्रतिनिधी

डॉक्टरांनी मृत घोषित केलेला 34 वर्षीय तरुण अंत्ययात्रेदरम्यान जिवंत झाल्याची धक्कादायक घटना कलबुर्गी जिल्ह्यातील अफझलपूर येथे उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या तरुणावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, रुग्णाची तब्येत अधिकच खालावल्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. तर याबाबत शासकीय रुग्णालयाने रुग्णास डिस्चार्ज देताना तो जिवंत असल्याचे म्हटले आहे. 

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार ईश्‍वर पावडे याचा मृतदेह कालच नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. शुक्रवारी अंत्यविधीदरम्यान त्याचा श्‍वास चालू असल्याचे दिसून आले. हा तरुण जिवंत असल्याचेही आढळले. संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी या तरुणाच्या नातेवाईकांनी प्रयत्न चालविले होते. ईश्‍वर पावडे असे या जीवदान मिळालेल्या 34 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील अफझलपूर, गाणगापूर गावाचा रहिवासी आहे. दोन वर्षांपासून मुंबईत खासगी कंपनीत काम करणारा ईश्‍वर आजारपणामुळे गावी गेला होता. उपचारासाठी तो सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. तेथे त्याची प्रकृती अधिकच खालावल्यानंतर त्याला सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले; परंतु तो उपचारास प्रतिसाद देत नसल्याचे दिसून आले. त्याचा श्‍वासोच्छ्वास बंद झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करून त्याचा मृतदेह घेऊन जाण्याचा सल्ला दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यानुसार नातेवाईकांनी सोलापुरातून हा मृतदेह गावाकडे नेला. अंत्यविधीसाठी त्याला स्मशानात नेत असताना त्याचा श्‍वासोच्छ्वास सुरू असल्याचे काहींच्या निदर्शनास आले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. त्याला तातडीने तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले व अतिदक्षता कक्षात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. या प्रकाराबद्दल डॉक्टरांनीदेखील आश्‍चर्य व्यक्त केले असून ईश्‍वर जिवंत असताना त्याचे निधन झाल्याचे घोषित करणार्‍या डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल करण्याची तयारी नातेवाईकांनी चालविली आहे. या घटनेने सोलापूरसह कलबुर्गी येथे एकच खळबळ उडाली आहे.