Sun, Aug 25, 2019 23:29होमपेज › Solapur › वीर धरणामधून ३२ हजार ४५९ क्युसेस विसर्ग करणार

वीर धरणामधून ३२ हजार ४५९ क्युसेस विसर्ग करणार

Published On: Aug 21 2018 10:34PM | Last Updated: Aug 21 2018 10:33PMबोंडले: विजयकुमार देशमुख

नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा-देवधर, गुंजवणी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा-देवधर, गुंजवणी व वीर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. यामुळे नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा-देवधर व गुंजवणी या तीन धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग वीर धरणात येत आहे. या येणार्‍या विसर्गामुळे वीर धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग नीरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.

नीरा खोर्‍यात पावसाचा जोर कायम असल्यामुळे नीरा खोर्‍यातील भाटघर धरणामधून १० हजार ७१४ क्युसेस, नीरा-देवधर धरणामधून ३ हजार ३०० क्युसेस तर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरलेल्या गुंजवणी धरणामधून २ हजार क्युसेस विसर्ग सोडला जात आहे. तसेच या चार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून डोंगर माथ्यावरूनसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी वीर धरणात येत असल्यामुळे वीर धरणात येणारा विसर्ग वाढत आहे.

दरम्यान आज सायंकाळी ६ वाजता वीर धरणाचे ५ दरवाजे ४ फुटांनी उचलण्यात आले असून यामधून नीरा नदीत २३ हजार १८५ क्युसेस विसर्ग सोडण्यात येत आहे.

नीरा-देवधर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे व वीर धरणात येणार्‍या विसर्गाचा विचार करून वीर धरणामधून आज रात्री कोणत्याही क्षणी विसर्ग ३२ हजार ४५९ क्युसेसपर्यंत वाढविण्याची शक्यता उपविभागीय अभियंता, वीर धरण यांच्याकडून वर्तविण्यात आली आहे.
विसर्गात वाढ होत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.