Mon, Jun 24, 2019 20:58होमपेज › Solapur › पंढरपूर पालिकेची मंजूर ३० पदे रिक्‍त

पंढरपूर पालिकेची मंजूर ३० पदे रिक्‍त

Published On: May 03 2018 10:50PM | Last Updated: May 03 2018 9:44PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर नगरपालिकेत संवर्गश्रेणीच्या 30 विविध पदांचा आकृतीबंध मंजूर असतानाही  पदे भरली जात नाहीत. 30 ऑक्टोबर 2015 रोजी नगरविकास खात्याने या पदांना मंजुरी दिली आहे. मात्र अडीच वर्षे उलटूनही मंजूर पदे भरली न गेल्यामुळे नगरपालिकेचा कारभार  गतिमंद झाला आहे.

पंढरपूर नगरपालिकेस नगरविकास खात्याने 30 ऑक्टोबर 2015 रोजी संवर्गश्रेणीच्या 30 पदांना मंजुरी दिली. नगरपालिकेस आवश्यक असलेल्या पदांना मंजुरी मिळाल्यामुळे  नगरपालिकेचे कामकाज गतिमान  होऊन  गुणात्मक पुरेशा मनुष्यबळाच्या जोरावर रूळावर येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र अडीच वर्षांत शासनाने यापैकी एकही पद भरलेले नाही. मंजूर पदांमध्ये स्थापत्य उपअभियंता, विद्युत उपअभियंता, संगणक उपअभियंता, जलदाय मलनिस्सारण व  स्वच्छता उपअभियंता, लेखापाल व लेखापरीक्षक अभियंता आणि उपअभियंता, कर निर्धारक व प्रशासकीय सेवा अभियंता व उपअभियंता, अग्निशमन उपअभियंता, नगररचनाकार आणि विकाससेवा अभियंता, अशी अनेक महत्त्वाची पदे भरण्यात आली नाहीत. या वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांचा आकृतीबंध मंजूर होऊन अडीच वर्षे पूर्ण झाली तरी आजतागायत ही पदे शासनाने पंढरपूर नगरपालिकेला दिली नाहीत.

प्रशासनाने नगरपालिकेची घडी लवकर बसवून पालिका क्षेत्रातील विकासकामे, नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी ही पदे भरणे आवश्यक आहे. नगरपालिकेमधील ‘अ’, ‘ब’, ‘क’ श्रेणीची एकूण 30 पदे मंजूर आहेत. मात्र त्यातील 9 पदांचेच अधिकारी आहेत. 

परिणामी पालिकेतील या विविध कार्यालयांमध्ये महत्त्वाची 21 पदे रिक्‍त असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही पदे रिक्‍त असून त्या भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येत नाही तसेच या कार्यालयांमधील अनेक कर्मचारी निवृत्त होत असल्याने दिवसेंदिवस ही संख्या घटत आहे. सर्वसामान्य नागरिकांची सरकारी कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेळेवर कामे होत नसल्यामागे  याठिकाणी असलेली रिक्‍त पदे कारणीभूत असल्याची बाब समोर येत आहे. यासाठी ही पदे नगरपालिकेस लवकर मिळाली पाहिजेत, अशी मागणी होत आहे.

पदे रिक्‍त झाल्यास निष्कासित होणार

पंढरपूर नगरपालिकेकडे आस्थापनेवरील 173 पदे आहेत, तर स्वच्छता कर्मचारी 353 आहेत. 30 ऑक्टोबर 2015 च्या नवनिर्मित आकृतीबंधानुसार वर्ग 3 आणि 4 आस्थापनेवरील सेवानिवृत्त पदे रिक्‍त झाल्यास ते पद निष्कासित होणार असल्याने पुढीलकाळात आस्थापनेवरील स्थायी मंजूर पदांमध्ये नगरपालिकेडे श्रेणी तीन, चारची 72 पदे व स्वच्छता कर्मचारी 157 एवढेच राहणार आहेत.