Sun, Apr 21, 2019 01:53होमपेज › Solapur › रिलायन्स‍ टॉवरमध्ये अडकून ३० पक्ष्यांचा मृत्‍यू

रिलायन्स‍ टॉवरमध्ये अडकून ३० पक्ष्यांचा मृत्‍यू

Published On: Jul 19 2018 2:35PM | Last Updated: Jul 19 2018 2:36PMसोलापूर : प्रतिनिधी 

शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या रिलायन्स जिओ कंपन्यांच्या टॉवरमध्ये वरच्या बाजूल असलेल्या छिद्रातून आत गेलेल्या तब्बल ३० पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे आज उघड झाले आहे.  विजापूर रस्त्यावरील राज्य मराठी पत्रकार भवनचौकात रस्त्याच्या मधोमध असलेल्या साठ फुटाच्या टॉवरचा दरवाजा उघडल्यावर ही घटना उघडकीस आली आहे. शहरातील अनेक टॉवरमध्ये पक्ष्यांच्या मृतदेहांचा खच मिळेल अशी भिती पक्षीतज्ञांनी व्यक्त केली आहे.

सोलापूर शहरामध्ये सध्या अनेक ठिकाणी रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे साठ फूट उंच टॉवर आहे. या टॉवरच्या तळाशी एक पक्षी अडकल्याची माहिती वन्यजीव प्रेमी संस्थेच्या पक्षीमित्र मुकुंद शेटे यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत रिलायन्सच्या कार्यालयात संपर्क साधून टॉवरच्या खालील दार उघडण्याची विनंती केली. मात्र सध्या सर्व टॉवर्स बंद असून टॉवर उघडल्यास महापालिकेच्या अधिकार्‍यांना आम्ही टॉवर्स सुरु केल्याचा समज होऊन त्यांच्या पुढच्या कार्यवाहीला सामोरे जावे लागेल असे कारण सांगत त्यांनी टॉवरच्या तळाशी असलेले दार उघडण्यास टाळाटाळ केली. अखेर शेटे यांनी महापालिकेच्य सहाय्यक पशू अधिकारी भारत शिंदे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी आज रिलायन्स टॉवरच्या अधिकार्‍यांना टॉवरचे दार उघडण्याच्या सूचना दिल्या. सकाळी अकराच्या सुमारास रिलायन्‍सच्या दोन कर्मचार्‍यांनी येऊन टॉवरसे दार उघडले तेव्हा टॉवरच्या तळाशी तब्बल साळुंखी पक्ष्यांच्या मृतदेहाचा खच दिसला. सर्व पक्ष्यांना काढून बाहेर काढण्यात आले. यावेळी एक साळुंकी जिवंत आवस्थेतही आढळली. तिलाही तातडीने बाहेर काढून वैद्यकीय उपचारासाठी प्राणी संग्रहालयात पाठविण्यात आले.

टॉवरचे छिद्र पक्ष्यांसाठी मृत्यूचे व्दार  : शेटे

रिलायन्स टॉवरच्या वरच्या बाजूला  बुहदा मोठे छिद्र असावे. साळुंखी पक्षी हा चिद्रामध्ये घरटे बांधतो. त्यामुळे त्या छिद्रात गेल्यावर खाली ६० फूट खोल पोकळ टॉवर आणि वायर्स यामुळे तो अडकून तळाशी आला. टॉवरच्या आत वायर्स आणि अँगल्स यामुळे पक्ष्यांना पंख पसरता येत नसल्याने अडकून त्यांचा मृत्यू झाला असावा. त्यामुळे हे टॉवर्सचे छिद्र म्हणज पक्षांसाठी मृत्यचे व्दार ठरत असल्याचा आरोप पक्षीमित्र शेटे यांनी केले आहे.

सर्व टॉवर उघडून तपासणी करणार : पशू अधिकारी 

पक्षीमित्र शेटे यांनी माहिती दिल्यानंतर आम्ही रिलायन्स कंपनीला सांगून टॉवर्सचे दार उघडण्यास सांगितले. त्यामध्ये तीस साळुंखी पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे दिसले. शहरातील इतर टॉवर उघडून त्यातही अशी घटना घडली आहे का हे पाहण्यात येईल. या टॉवरमधील मृत पक्ष्यांचा पंचनामा करून त्याचा अहवाल अधिकार्‍यांकडे पाठवत आहे. अशी माहिती सहाय्यक पशू अधिकारी भारत शिंदे यांनी दिली.