Thu, Apr 25, 2019 17:33होमपेज › Solapur › गोवा बनावटीची दारु बाळगणार्‍या तिघांना सक्‍तमजुरी

गोवा बनावटीची दारु बाळगणार्‍या तिघांना सक्‍तमजुरी

Published On: Feb 22 2018 10:26PM | Last Updated: Feb 22 2018 10:10PMसोलापूर : प्रतिनिधी

गोवा  बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा सोलापूर जिल्ह्यातून कर्नाटक राज्यात विक्रीस नेणार्‍या तिघांना दारुबंदी न्यायालयाचे  न्यायाधीश संतोष पवार यांनी 3 वर्षे सक्‍तमजुरी व 3 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सोमनाथ तुकाराम भोसले (वय 32, रा. खवणी, ता. मोहोळ), अविनाश दिगंबर डोंगरे (वय 23, रा. आढेगाव, ता. मोहोळ), समाधान तुकाराम भोसले (वय 29, रा. खवणी, ता. मोहोळ) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

26 जुलै 2017 रोजी पहाटे सव्वातीनच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील केगाव येथे गोवा राज्यातील विदेशी मद्याचा साठा उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रविंद्र आवळे, निरीक्षक समीर पाटील, दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे, राहुल बांगर, सहायक निरीक्षक मुकेश चव्हाण, जवान गजानन होळकर, मलंग तांबोळी, विजय शेळके, रशीद शेख, संजय नवले, गजानन ढब्बे, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंडी यांच्या पथकाने  जप्त  केला होता. यामध्ये 310 विदेशी मद्याचे बॉक्स, 2 आयशर, 2 पिकअप जीप, एक स्कॉर्पिओ गाडी व एक इनोव्हा गाडी असा 62 लाख 61 हजार 721 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

याप्रकरणात सोमनाथ भोसले, समाधान भोसले, अविनाश डोंगरे, पोपट मनोहर मुळे (वय 32, रा. खंडाळी, ता. मोहोळ), अवधूत रामचंद्र माळी (वय 24, रा. शेजबाभूळगाव) यांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी न्यायाधीश पवार यांच्यासमोर झाली. पंचाच्या साक्षी व तपास चांगल्या पध्दतीने झाल्याने न्यायाधीश पवार यांनी सोमनाथ भोसले, समाधान भोसले, अविनाश डोंगरे या तिघांना शिक्षा सुनावली, तर इतर दोघांची मुक्‍तता केली. याप्रकरणी सरकारच्यावतीने अ‍ॅड. नितीन नरवाडकर, अ‍ॅड. विद्या बनसोडे यांनी, तर आरोपीच्यावतीने अ‍ॅड. महेश जगताप, अ‍ॅड. धावणे, अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी काम पाहिले.