Mon, May 20, 2019 18:04होमपेज › Solapur › तीन सहायक फौजदारांसह पाच पोलिस निलंबित

तीन सहायक फौजदारांसह पाच पोलिस निलंबित

Published On: Dec 24 2017 1:47AM | Last Updated: Dec 24 2017 1:47AM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

येथील जिल्हा न्यायायातील सत्र न्यायाधीशांच्या कोर्ट हॉलमध्ये जाऊन कुर्‍हाड उगारून त्यांच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍या वृद्धाला न्यायालयाने दोनदा आदेश देऊनही पोलिसांनी पकडले नाही. यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या तीन सहायक फौजदारांसह पाच पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांनी निलंबित केले. या कारवाईमुळे पोलिसांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सहायक फौजदार वसंत चिंतामणी जैन (नेमणूक-विजापूर नाका पोलिस ठाणे), सहायक फौजदार राम मल्लिकार्जुन पालवे (नेमणूक- फौजदार चावडी पोलिस ठाणे), सहायक फौजदार भीमाशंकर मारुती वाघे (नेमणूक-पोलिस मुख्यालय, सोलापूर शहर), पोलिस हवालदार अशोक बाबुराव पाटील (ब. नं. 232, नेमणूक- एमआयडीसी पोलिस ठाणे), पोलिस हवालदार ज्ञानदेव खंडू कोळेकर (ब. नं. 491, नेमणूक- जेलरोड पोलिस ठाणे) अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

बुधवार, दि.20 डिसेंबर 2017 दुपारी दीडच्या सुमारास सत्र न्यायाधीश हेजीब यांच्या कोर्ट हॉलमध्ये पोपट शामराव नलावडे (वय 67, रा. हळदुगे, ता. बार्शी) हा वृद्ध आला व तो माहिती अधिकाराच्या अर्जावर पोहोच मागत होता. ही पोहोच देता येणार नाही, असे न्यायालयाने सांगितले असता पोपट नलावडे   यांनी  सोबत आणलेली कुर्‍हाड काढून न्यायालयातील कामकाजात अडथळा आणला होता. त्यामुळे न्यायालयाने सहायक फौजदार जैन, वाघे, पालवे, हवालदार गावित, कोळेकर या पोलिस कर्मचार्‍यांना बोलावले असता वरील सर्व कर्मचारी हे 10 ते 15 मिनिटानंतर  उशिराने पोहोचले. न्यायाधीशांनी या सर्व कर्मचार्‍यांना पोपट नलावडे यास आवश्यक बळाचा वापर करुन ताब्यात घेण्याचे दोनदा आदेश दिलेले असतानाही या सर्व कर्मचार्‍यांनी न्यायालयाचा आदेश मानला नाही. त्यावेळी या कर्मचार्‍यांनी केवळ बघ्याची भूमिका घेऊन तटस्थ राहून कोणतीही कारवाई न करता त्यांच्या कर्तव्यात  कसूर केली.  ही बाब अतिशय गंभीर असून त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे.

जबाबदार पोलिस अंमलदार म्हणून  पोलिस  खात्यासारख्या शिस्तप्रिय खात्यात नेमणुकी असताना विद्यमान न्यायालयाने आदेश दिलेले असतानाही त्यांच्या आदेशाप्रमाणे पोपट नलावडे यास ताब्यात घेणे हा पोलिस कर्मचार्‍यांच्या कर्तव्याचा भाग होता. परंतु कर्तव्याला विसरुन कोणतीही कारवाई न करता, भित्रेपणा दाखवला तसेच कायद्याचे पालन करणे हे माहिती असतानाही त्याचा जाणीवपूर्वक भंग केल्याप्रकरणी पोलिस  आयुक्‍त  तांबडे यांनी वरील सर्व कर्मचार्‍यांना निलंबित केले.  

निलंबित केलेल्या सर्व कर्मचार्‍यांची नेमणूक ही पोलिस मुख्यालय येथे करण्यात आली असून निलंबित कालावधीमध्ये दररोज दोनवेळा हजेरी देणे बंधनकारक असून त्यांना खासगी व्यवसाय व नोकरी करता येणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.