Sun, Jan 20, 2019 10:19होमपेज › Solapur › पंढरपूर : तीर्थकुंडात लघुशंका करणार्‍या बडवेला कारावासच

पंढरपूर : तीर्थकुंडात लघुशंका करणार्‍या बडवेला कारावासच

Published On: Jan 23 2018 7:31PM | Last Updated: Jan 23 2018 9:33PMपंढरपूर : प्रतिनिधी

 2003 साली श्री विठ्ठल मंदिरातील गोमुख तीर्थकुंडात लघुशंका केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली 3 महिने कैदेची आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली असून, आरोपी गोपाळ बडवे यास पोलिसांनी अटक केली आहे. 

15 मे 2003 साली आरोपी गोपाळ बडवे याने रात्री 1 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गोमुख कुंडामध्ये लघुशंका केली होती. त्याच वेळी कर्तव्यावर हजर असलेल्या माणिक दशरथ यादव या मंदिर समितीच्या कर्मचार्‍याने हा प्रकार पाहिला आणि दुसरे सुरक्षा कर्मचारी मोरे, डोंगरे व सरवदे यांना बोलावून हा प्रकार दाखवला. त्यानंतर गोपाळ बडवे याच्याविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

पंढरपूर येथील दुसरे न्यायदंडाधिकारी वर्ग 1 यांच्यापुढे हा खटला चालल्यानंतर 5 जून 2010 साली न्यायालयाने गोपाळ बडवे यास 3 महिने साध्या कैदेची आणि 1 हजार रुपये दंडाची तसेच दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली होती. मात्र या शिक्षेला आरोपी गोपाळ बडवे याने पंढरपूर जिल्हा सत्र  न्यायालयात आव्हान दिले होते. 

या न्यायालयात खटला चालल्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल सर्व साक्षी पुरावे, नेत्र पुरावे, साक्षीदार तपासून  उलट तपासणी घेऊन जिल्हा सत्र न्यायाधीश पी.आर.देशमुख यांनी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवत आरोपीचे अपील नामंजूर केले.  त्यानुसार आरोपी गोपाळ बडवे यास 3 महिने साधी कैद, 1 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी 1 महिन्याची साधी कैद अशी शिक्षा भोगावी लागणार आहे. दरम्यान, पोलिसांनी गोपाळ बडवे यास लगेच अटक करून ताब्यात घेतले आहे. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. सारंग वांगीकर यांनी काम पाहिले.