Thu, Apr 25, 2019 15:40होमपेज › Solapur › ‘परिवहन’च्या 27 बसेस रस्त्यावर

‘परिवहन’च्या 27 बसेस रस्त्यावर

Published On: May 14 2018 11:15PM | Last Updated: May 14 2018 11:01PMसोलापूर : प्रतिनिधी

तब्बल एक महिन्याहून अधिक कालावधीनंतर सोमवारी महापालिका बसेस रस्त्यावर धावताना दिसून आल्या. दिवसभरात एकूण 27 बसेस धावल्याची माहिती मनपा परिवहन उपक्रमाचे सभापती तुकाराम मस्के यांनी दिली.

9 महिन्यांचे थकीत वेतन व पेन्शनच्या मागणीसाठी 9 एप्रिलपासून परिवहन उपक्रमाच्या कर्मचार्‍यांना बेमुदत बंदचे हत्यार उपसले होते. राजकीय व प्रशासनाच्या इच्छाशक्‍तीअभावी हा प्रश्‍न सुटत नव्हता. पालकमंत्री विजयकुमार देशमुख तसेच महापालिका आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांची याप्रश्‍नी नकारात्मक भूमिका दिसून आली. त्यामुळे प्रश्‍नाचे भिजत घोंगडे कायम होते. शनिवारी झालेल्या मनपा सभेत बंदविषयीचे तीव्र पडसात उमटल्याने अखेर महापौर शोभा बनशेट्टी यांनी सकारात्मक निर्णयाचे आश्‍वासन देत रविवारी बैठक घेतली. दरम्यान आयुक्‍तांच्या ताठर भूमिकेत 
बदल झाला. दोन महिन्यांचे वेतन व पेन्शन देण्यास मनपा आयुक्त राजी झाले. यावर युनियनने सकारात्मक भूमिका  घेत संप मागे घेण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला होता. 

युनियनने जाहीर केल्यानुसार बससेवा सुरु झाली. सकाळच्या शिफ्टमध्ये 11, दुपारच्या सत्रात 16 अशा एकूण 27 बसेस धावल्या. शहराबरोबरच मोहोळ, उळे, कासेगाव आदी ग्रामीण भागांत बससेवा सुरु झाल्याचे परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के यांनी सांगितले. 

मुंबईतील बैठक झाली रद्द
परिवहनप्रश्‍नी सोमवार, 14 मे रोजी मुंबईत बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी कामगार नेते नरसय्या आडम यांना सांगितले होते. मात्र शनिवारी महापौरांच्या बैठकीत तोडगा निघाल्याने मुंबईत आयोजित बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बससेवा गेल्या महिन्याभरापासून बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. 
अव्वाच्या सव्वा भाडे देऊन त्यांना रिक्षातून प्रवास करावा लागला. साहजिकच प्रवाशांना बंदचा आर्थिक फटका बसला. सोमवारी बससेवा पूर्ववत सुरु होताच त्यांना दिलासा मिळाला. लवकरच बसेसच्या संख्येत वाढ होणार असल्याची माहिती परिवहनच्या सूत्रांनी दिली.