Sun, Feb 17, 2019 07:03होमपेज › Solapur › दिलीप मानेंसह २६ जणांचे जामीन अर्ज फेटाळले

दिलीप मानेंसह २६ जणांचे जामीन अर्ज फेटाळले

Published On: Jun 23 2018 1:23AM | Last Updated: Jun 23 2018 1:23AMसोलापूर ः प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तब्बल 39 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालक दिलीप माने यांच्यासह 26 संचालकांच्या अटकपूर्व जामीन अर्जांवर शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. बी. हेजीब यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यामध्ये मानेंसह 26 संशयित आरोपी संचालकांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत, तर केवळ चौघा संचालकांनाच वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. 

रज्जाक शेख निंबाळे, महादेव चाकोते, दळवी व कमलापुरे या चौघांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे तसेच पोलिस तपासकामी व दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दररोज पोलिस ठाण्यात हजर राहण्याची अट त्यांना घालण्यात आली आहे. 

न्यायालयाने 17 संचालकांना सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर राहण्याचे आदेश  दिले होते.  मात्र, गैरहजर माफीचा अर्ज देऊन उच्च न्यायालयात हजर राहण्याच्या आदेशविरुद्ध याचिका दाखल केली होती. आरोपींना कोर्टात हजर राहण्याची तारीख नेमण्यात आली होती. त्यांना मोबाईल नंबर न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते; परंतु आरोपी आजपर्यंत न्यायालयात गैरहजर आहेत, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. राजपूत यांनी केला होता. या सुनावणीत जामीन झालेल्या आरोपींकडून अ‍ॅड. शशी कुलकर्णी, अ‍ॅड. थोबडे, अ‍ॅड. भारत कट्टे यांनी काम पाहिले आहे.