Tue, Apr 23, 2019 22:08होमपेज › Solapur › 256 गाळ्यांच्या दुरवस्थेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर

256 गाळ्यांच्या दुरवस्थेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर

Published On: Jan 15 2018 1:45AM | Last Updated: Jan 14 2018 9:55PM

बुकमार्क करा
 सोलापूर :  प्रतिनिधी

रविवार पेठेतील 256 रहिवास गाळ्यांच्या दुरवस्थेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे; मात्र थकीत कर भरल्याशिवाय काहीच सुधारणा वा नवीन घर बांधून देण्याची योजना राबविणार नाही, असा पवित्रा महापालिका आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांनी घेतला आहे. सुमारे 50 वर्षांपूर्वी पूर्व भागातील काही झोपडपट्ट्या जळल्या होत्या. या लोकांचे पुनर्वसन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. याकरिता रविवार पेठेतील मनपाच्या जागेत एकूण 256 रहिवास गाळे बांधण्यात आले होते.

या गाळेधारकांनी सुरुवातीला नाममात्र भाडे आकारले जात होते. नंतर या गाळेधारकांना मिळकतकरही लागू करण्यात आला. मात्र, मिळकतकर भरण्यास गाळेधारक प्रतिसाद देत नसल्याचे चित्र गेली अनेक वर्षे कायम आहे. फक्‍त 28 रुपये भाडे या गाळेधारकांकडून भरण्यात येत आहे. दुमजली अनेक इमारतींमध्ये हे 256 गाळे आहेत. या इमारती जुन्या झाल्याने काही इमारतींच्या गॅलर्‍या धोकादायक बनल्या आहेत. आतापर्यंत अनेक गॅलर्‍या कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या गॅलर्‍यांची दुरुस्ती मनपाकडून व्हावी, अशी गाळेधारकांनी मागणी आहे. नुकतेच या मागणीविषयी गाळेधारकांनी आनंद बिरू, नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. 

यावेळी आयुक्‍त म्हणाले, गेल्या चार-पाच महिन्यांपूर्वी मी या गाळ्यांना भेट देऊन पाहणी केली होती. या इमारतींची दुरवस्था झाल्याने येथे पंतप्रधान आवास योजनेतून नवीन रो-हाऊसेस बांधून या गाळेधारकांचे पुनर्वसन  करण्याचा प्रस्ताव मी मांडला. मात्र, याला प्रतिसाद मिळत नाही. नवीन योजना असो वा दुरुस्ती-सुधारणा कामासाठी या गाळेधारकांनी मनपाचा थकविलेला कर भरणे आवश्यक आहे, मात्र अनेकदा आवाहन करूनही गाळेधारक प्रतिसाद देत नाहीत, असे दिसून येते. तूर्त गाळेधारकांनी थकीत रकमेपैकी निम्मी रक्‍कम तरी भरावी अन्यथा सुधारणा कामे करणार नाही, असे आयुक्‍तांनी याप्रसंगी सांगितले.

नवीन घरे बांधण्याच्या प्रस्तावाबाबत गाळेधारकांमध्ये एकमत नसल्याची अडचण आहे, असा सूर यावेळी काही महिलांनी आयुक्तांसमोर आळविला. मात्र कर भरण्यासंदर्भातील भूमिकेवर आयुक्‍त ठाम आहेत. दरम्यान,  आयुक्‍तांच्या नवीन रो-हाऊसेसच्या प्रस्तावावर गाळेधारकांनी कर भरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन बिर्रू व वल्याळ यांनी केले आहे.