Fri, Aug 23, 2019 14:26होमपेज › Solapur › शेतकर्‍यांना 227 कोटींची कर्जमाफी

शेतकर्‍यांना 227 कोटींची कर्जमाफी

Published On: Dec 13 2017 2:00AM | Last Updated: Dec 12 2017 10:54PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र 44766 शेतकर्‍यांना 227 कोटी 61 लाख 14553 रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. शेतकरी कर्जमाफीअंतर्गत 21758 शेतकर्‍यांना वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळणार आहे. 12882 शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. त्यापोटी 23 कोटी 70 लाख 25213 रुपये वितरित करण्यात आले आहेत. आज जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी ही माहिती दिली.

या योजनेतून राज्यात आत्तापर्यंत सुमारे 41 लाख शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. योजनेत राज्यात एकूण 77 लाख अर्ज प्राप्त झाले. छाननीत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन 69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. जे शेतकरी पात्र आहेत, पण अर्ज केला नाही अशा शेतकर्‍यांनाही या योजनेत सामावून घेणार. पात्र शेतकर्‍यांना रक्कम मिळेपर्यंत योजना सुरु ठेवली जाणार आहे.

राज्य शासनाने शेतकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. या योजनेतून 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2016 या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना त्यांचे कर्ज 30.06.2016 अखेर थकीत व 31 जुलै 2017 पर्यंत परतफेड न केलेल्या थकीत कर्जावर रूपये 1.50 लाखांपर्यंत माफ होणार आहे. ज्या शेतकर्‍यांचे 1.50 लाखांपेक्षा जास्त कर्ज थकीत असल्यास अशा शेतकर्‍यांसाठी एक रकमी परतफेड योजना लागू केली आहे. ज्या शेतकर्‍यांनी 1.50 लाखांवरील रक्कम भरणा केल्यास त्यांचे कर्ज खात्यावर शासनाकडून 1.50 लाखपर्यंत रक्कम भरणा केली जाणार आहे.

ज्या शेतकर्‍यांनी नियमित परतफेड केली आहे. अशा शेतकर्‍यांसाठी प्रोत्साहनपर योजना लागू केली आहे. ज्या शेतकर्‍यांनी सन 2015-16 मध्ये कर्ज घेऊन त्याची परतफेड 30.06.2017 पर्यंत केली आहे. तसेच सन 2016-17 मध्ये कर्ज घेतले असल्यास त्याची परतफेड 31.07.2017 पर्यंत केली असल्यास अशा शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर योजनेमध्ये त्यांनी परतफेड केलेल्या कर्जाच्या 25 टक्के पण किमान 15 हजार व जास्तीत जास्त रूपये 25 हजार एवढी रक्कम या शेतकर्‍यांच्या बचत खात्यावर शासनातर्फे जमा केली जाणार आहे.

जिल्ह्यातील 14572 शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानास पात्र ठरले आहेत. त्यापैकी 12882 शेतकर्‍यांच्या खात्यावर 23 कोटी 70 लाख 25213 रुपये जमा करण्यात आले आहेत. 21758 शेतकर्‍यांना वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळणार आहे. त्या शेतकर्‍यांनी संबंधित बँकेस संपर्क साधावा. या वन टाईम सेटलमेंटची 31 मार्च 2018 पर्यंत मुदत आहे. अशा शेतकर्‍यांनी दीड लाख रुपयांवरील कर्जाची रक्कम भरल्यास त्यांना कर्जमाफी मिळणार आहे, असे जिल्हा निबंधक अविनाश देशमुख यांनी सांगितले.

कर्जमाफीवर एक दृष्टिक्षेप
1) जिल्ह्यातील 44 हजार 766 शेतकर्‍यांना आता 227 कोटी 61 लाख 
14  हजार 553 रुपयांचा लाभ.
2) 12 हजार 882 शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर अनुदान.
3) त्यापोटी 23 कोटी 70 लाख 25 हजार 213 रुपये वितरित.
4) 21 हजार 758 शेतकर्‍यांना वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळेल.
5) जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या खात्यात रक्‍कम जमा.
6) जिल्हा बँकेमार्फत सुमारे 38 हजार 88 शेतकर्‍यांना एसएमएस.