होमपेज › Solapur › मोहोळ : युवतीची हत्या करून मृतदेह फेकला विहिरीत

मोहोळ : युवतीची हत्या करून मृतदेह फेकला विहिरीत

Published On: Jul 01 2018 12:11AM | Last Updated: Jul 01 2018 12:02AMमोहोळ : वार्ताहर

अज्ञात व्यक्‍तींनी एका 22 वर्षीय युवतीची हत्या करून मृतदेह एका पोत्यात भरून विहिरीत फेकून दिला. शनिवार, 30 जून रोजी मोहोळ तालुक्यातील सावळेश्‍वर ते बीबीदारफळ रोडवरील कॅनॉलनजीक असलेल्या विहिरीत हा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. मृत युवतीची ओळख अद्याप पटलेली नाही.

सविस्तर वृत्त असे, मोहोळ तालुक्यातील सावळेश्‍वर गावच्या शिवारात बीबीदारफळ रोडवरील कॅनॉलनजीक बन्‍ने यांचे शेत आहे. शनिवार, 30 जून रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास विहिरीतून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले. त्यावेळी एक पोते पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले. याबाबत संशय वाढल्याने ही बाब त्यांनी मोहोळ पोलिसांना कळविली.

घटनेची माहिती मिळताच सपोनि विक्रांत बोधे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानिक नागरिकांनी पोत्यात काय आहे, हे पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी पोते विहिरीतून बाहेर काढले असता त्यामध्ये अंदाजे बावीस ते पंचवीस वर्षांच्या तरुणीचा मृतदेह आढळला. विहिरीतील पाण्यामुळे प्रेत इतके सडले होते की त्या प्रेताची ओळख पटविणे अवघड बनले. त्यामुळे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.

याबाबत मोहोळ पोलिसांत अज्ञात युवतीचा खून करणार्‍या अज्ञात व्यक्‍तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सपोनि विक्रांत बोधे हे करीत आहेत. 

याबाबत मृत युवतीची ओळख पटविण्यासाठी मोहोळ पोलिसांनी मृतदेहाचे फोटो जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत पाठवले आहेत. मृताच्या अंगात पिवळा टी-शर्ट असून जांभळ्या रंगाची लेंगिस आहे. त्यामुळे मिसिंग व्यक्तींच्या रजिस्टरवरुन ओळख पटविण्याचे आवाहन मोहोळ पोलिसांनी केले आहे.