होमपेज › Solapur › पाच थरांचा थरार; 20 फुटांवरील दहीहंडी गोविंदांनी फोडली

पाच थरांचा थरार; 20 फुटांवरील दहीहंडी गोविंदांनी फोडली

Published On: Sep 04 2018 1:20AM | Last Updated: Sep 03 2018 11:26PMसोलापूर : प्रतिष्ठान

‘गोविंदा रे गोविंदा’च्या गाण्याचा स्पिकरवर बेभान होऊन नाचणारे गोविंदा, पाण्याचा टँकरव्दारे सातत्याने त्यांच्या अंगावर सुरु असलेला पाण्याचा वर्षाव,  मधूनच गुलालाची उधळण अशा चिंबचिंब भिजलेल्या गोविंदांनी एकावर एक चढत थरावर थर रचायला सुरुवात केली.  ओल्या अंगावरून एखादा जरी गोविंदा घसरला की अख्खा थर कोसळायचा आणि पुन्हा दुप्पट जोशाने नव्याने थर रचायला सुरुवात होत होती. अनेकदा पडून पुन्हा थर रचून अखेर दीड तासाच्या प्रयत्नांतून पाच थरावर चढलेल्या गोविंदांच्या हाती वीस फुटांवरील दहीहंडी आली आणि ती फोडताच लाह्या-दुधाचा अभिषेक सार्‍या थरातील गोविंदांना झाला आणि पुन्हा ‘गोविंदा रे गोविंदाचा’ जल्लोष झाला.

सोलापुरातील बाळी वेस परिसरामध्ये सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याची परंपरा सुमारे शंभर वर्षांपासूनची आहे. ह.भ.प. लक्ष्मण महाराज यांनी ही परंपरा सुरु केली होती. ती वडार समाजबांधवांनी आजपर्यंत अखंडपणे अबाधित राखली आहे. 

यंदाही सालाबादाप्रमाणे कृष्णाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी वडार समाज मंदिरातून श्रीकृष्णाची पालखी  वाजतगाजत निघाली. बाळी वेस येथे येईपर्यंत वाटेतील सुमारे पाच दहीहंडी पालखीत सहभागी झालेल्या गोविंदांनी फोडल्या. मात्र बाळी वेसमधील सर्वात प्रमुख आणि सर्वात उंच दहिहंडी फोडतानाचा थरार पाहण्यासाठी अवघे सोलापूर लोटले होते. बाळी वेस येथील दहीहंडी फोडल्यावर पुढे चाटी गल्ली, पश्‍चिम मंगळवार पेठ पोलिस चौकी, मधला मारुती, माणिक चौक, जुनी फौजदार चावडी, दत्त चौक, नवी पेठ, गंगाविहार, चौपाड, नवजवान गल्ली, पत्रा तालीममार्गे पुन्हा वडार गल्ली येथे आल्यावर पालखीचा समारोप झाला.

यादरम्यान वडार समाजबांधवांबरोबर सार्‍या जाती-धर्माच्या  गोविंदांनी सहभाग घेतला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पूजा करून पालखीला सुरुवात झाली. यावेळी डॉ. किरण देशमुख, माजी नगरसेवक जगदीश पाटील, अनंत जाधव, उपमहापौर शशिकला बत्तुल, महिला बालकल्याण सभापती बिर्रु, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, वाडियाराजचे संस्थापक नितीन बंदपट्टे, नागनाथ चौगुले, दयावान ग्रुपचे अध्यक्ष अशोक अलकुंटे, विशाल शिंगे, सचिन इरकल, भीमाशंकर बंदपट्टे, निलेश यमपुरे, सचिन अलकुंटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन दयावान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विनायक विटकर यांनी केले होते. यावेळी ‘महिलांची सुरक्षा’ ही थीम घेऊन चौकाचौकांत जनजागृती करण्यात आली.