Tue, Mar 19, 2019 15:31होमपेज › Solapur › टेंभुर्णीत एटीएममधून मिळाली  2 हजारांची बनावट नोट

टेंभुर्णीत एटीएममधून मिळाली  2 हजारांची बनावट नोट

Published On: May 26 2018 12:20AM | Last Updated: May 25 2018 10:43PMटेंभुर्णी  प्रतिनिधी 

टेंभुर्णीत शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र बँकेच्या एटीएममधून एका ग्राहकाला चक्क दोन हजार रुपयांची बनावट नोट मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. टेंभुर्णीतील प्रसिद्ध बागायतदार व महाराष्ट्र बँकेचे खातेदार राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी सकाळी 11.31 वा. महाराष्ट्र बँकेच्या एटीएममधून सहा हजार रुपये काढले. यात त्यांना दोन हजार रुपयांच्या तीन नोटा मिळाल्या. ही रक्कम घेऊन ते मार्केट यार्डातील स्टेट बँकेत गेले. तेथे ते पैसे डिपॉझिट करण्यासाठी रोखपालाकडे दिले असता स्टेट बँकेच्या रोखपालाने त्यातील 2000 रुपयांची एक नोट बनावट असल्याचे सांगितले.

राजेंद्र भोसले यांनी ताबडतोब महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापकाकडे याची तक्रार केली. सुरुवातीला त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र भोसले यांनी तुमच्या बँकेच्या एटीएममधूनच रक्कम काढली असल्याचे वारंवार सांगितले. यामुळे व्यवस्थापकाने भोसले यांच्याकडून लिहून घेऊन 2 हजार रुपये रक्कम देऊन टाकली. पाण्यात बुडविल्याबरोबर या नोटेचा रंग फिका झाला. मात्र बँकेच्या एटीएममधूनच बनावट नोटा मिळू लागल्याने विश्‍वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्‍न सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे.