Wed, Mar 20, 2019 08:34होमपेज › Solapur › हद्दवाढ भागात 2 नवीन आरोग्य केंद्रांचा प्रस्ताव

हद्दवाढ भागात 2 नवीन आरोग्य केंद्रांचा प्रस्ताव

Published On: Feb 04 2018 1:58AM | Last Updated: Feb 03 2018 11:03PMसोलापूर ः प्रतिनिधी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सोलापूर महापालिकेसाठी दोन नवीन शहरी समुदाय आरोग्य केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेतर्फे आयुक्‍त आरोग्य सेवा व अभियान संचालकांना सादर करण्यात आला आहे. आरोग्य राज्यमंत्री तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी याकामी पुढाकार घेतला आहे.

हद्दवाढ भागात आरोग्य सुविधेचा अभाव आहे. हैदराबाद रस्त्यावरील दहिटणे, विडी घरकूल, शेळगी आदी भागातील लोकांना विशेषत: गरोदर स्त्रियांना उपचार वा प्रसूतीसाठी शहरात यावे लागते. वेळेवर उपचार व प्रसूती न झाल्यास गरोदर माता व बालकांचे मृत्यू होण्याचे प्रमाण खूप असल्याने आता ते राहत असलेल्या भागातच आरोग्य केंद्रांची सोय करण्याचा मनपाचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2015-16 मध्ये दोन शहरी समुदाय आरोग्य केंद्रांच्या बांधकाम नूतनीकरणास मंजुरी मिळाली होती; पण ती रद्द करून दोन नवीन शहरी समुदाय आरोग्य केंद्रे बांधकाम करण्यास परवानगी द्यावी, असे विनंती पत्र देण्यात आले होते.  सन 2017-18 या वर्षाच्या पी.आय.पी. रिअ‍ॅप्रोप्रिशनअंतर्गत दोन नवीन शहरी समुदाय आरोग्य केंद्र बांधण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. 

हद्दवाढ भागातील शेळगी व विडी घरकुल येथील लोकसंख्येचा विचार करुन याठिकाणी शहरी समुदाय आरोग्य केंद्राची आवश्यकता असल्याचे सांगत या दोन शहरी समुदाय आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव नुकताच मनपातर्फे आयुक्त आरोग्यसेवा व अभियान संचालकांना सादर करण्यात आला. राज्याचे आरोग्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून हा प्रस्ताव नुकतेच राष्ट्रीय आरोग्य अभियान शहर लेखापरिक्षक सिद्धेश्‍वर बोरगे यांनी सादर केला. या योजनेचा आराखडा मनपाचे उपअभियंता संदीप कारंजे यांनी तयार केला आहे. प्रत्येक केंद्रांत 30 ते 50 खाटांची सोय करण्यात येणार आहे. 

हद्दवाढचा विचार करुन प्रस्ताव : ना. देशमुख 

हद्दवाढ  विशेषत: दहिटणे, विडी घरकुल, शेळगी आदी भागातील लोकांच्या आरोग्य सुविधेसंदर्भातील गैरसोय लक्षात घेऊन हा प्रस्ताव देण्याची सूचना आपण केली आहे. त्यानुसार प्रस्ताव सादर झाला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळावी तसेच लवकरात लवकर हे आरोग्य केंद्र साकारण्यासाठी आरोग्य राज्यमंत्री या नात्याने आपला पाठपुरावा राहणार आहे, असे आरोग्य राज्यमंत्री तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.