होमपेज › Solapur › चैत्री यात्रेस 2 लाख भाविकांची उपस्थिती 

चैत्री यात्रेस 2 लाख भाविकांची उपस्थिती 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

चैत्री यात्रेच्या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून सुमारे 2 लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती दर्शवत चैत्री एकादशी साजरी केली. एकादशीनिमित्त भाविकांनी चंद्रभागेत स्नान करून विठूनामाच्या गजरात विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. हरिनामाच्या जयघोषाने पंढरीनगरी दुमदुमली आहे.

चैत्री यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मुखदर्शनाबरोबरच दर्शन रांगेतून पदस्पर्श दर्शन घेण्यावर भर दिला. दर्शन रांग पत्राशेडपर्यंत गेली होती. महाद्वार घाटापासून मुखदर्शनाच्या रांगेत भाविकांची मोठी गर्दी होती. कामदा एकादशीचा नित्यनियम पूर्ण करण्यासाठी भाविकांनी चंद्रभागा स्नान, पददर्शन, नामदेव पायरीचे दर्शन, कळस दर्शन घेऊन नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. यात्रेसाठी भाविक कावड घेऊन येत आहेत. कावडीस चंद्रभागा नदीमध्ये स्नान घालून पाणी घेऊन शिखर शिंगणापूरकडे मार्गस्थ होत आहेत.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने कामदा एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची नित्य पूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली, तर रुक्मिणीमातेची पूजा प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली.  टाळ, मृदंगाचा गजर, ग्यानबा-तुकारामाच्या जयघोषात नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात 
वारकरी दंग होते. 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, चौफाळा, महाव्दार घाट परिसर, भाविकांनी फुलून गेला आहे.

यात्रेनिमित्त पंढरीत येणार्‍या वारकर्‍यांच्या सोयी-सुविधांसाठी प्रशासनामार्फत स्वच्छ पिण्याच्या पाणी, तात्पुरती शौचालये, आरोग्य सेवा आदींची सोय करण्यात आली आहे. मदिर समिती मार्फत दर्शन रांग, दर्शन मंडप व मंदिर परिसरात  स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने मंदीर परिसरात छताची व्यवस्था करण्यात आली आहे. एस.टी. महामंडळामार्फत जादा बसेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वारी कालावधीत पोलिस प्रशासनामार्फत चोख  बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रासादिक साहित्य खरेदीसाठी भाविक गर्दी करीत आहेत.

Tags : Solapur, Solapur News, 2 lakh, devotees, present, Chaitra Yatra


  •