Thu, Jul 18, 2019 04:31होमपेज › Solapur › रिधोरेत घरफोडी; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

रिधोरेत घरफोडी; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

Published On: May 05 2018 11:23PM | Last Updated: May 05 2018 10:52PMकुर्डुवाडी :  प्रतिनिधी
घर आणि त्यात असलेल्या मिनी पोस्ट ऑफिसमधून चोरट्यांनी 1 लाख 75 हजार 144 रुपयांचा रोख रकमेसह ऐवज लंपास केला. ही घरफोडी रिधोरे (ता. माढा) येथे शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास झाली. सोलापूरहून आलेल्या श्‍वानांना चोरट्यांचा माग काढण्यात अपयश आले.

दत्तात्रय सुखदेव पंडित यांनी कुर्डुवाडी पोलिसांत फिर्याद दिली. पंडित यांचे घर आणि त्यातील एका खोलीत म्हैसगाव पोस्ट ऑफीस अंतर्गत मिनी पोस्ट ऑफीस कार्यरत आहे. शुक्रवारी रात्री पंडित यांच्यासह आई-वडील, पत्नी, मुले असे सर्वजण घराच्या पुढील दाराला कुलूप लावून घरावरील स्लॅबवर झोपण्यास गेले. शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास पंडित यांच्या आई पाणी पिण्यासाठी जिन्यावरुन खाली येत असताना त्यांना एक व्यक्‍ती दारासमोर उभी असलेली दिसली. दारही उघडे असल्याने त्यांनी आरडाओरड सुरु केली.

त्यांना घरातून तिघेजण बाहेर पळत येताना दिसले. कुटुंबातील सर्वजण जागे झाले. सर्वजण खाली आले असता दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी पोस्टाच्या तिजोरीतील 15 हजार 144 रुपयांची रोख रक्‍कम, पंडित यांच्या खोलीच्या कपाटातील 10 हजारांची रोख रक्‍कम व 1 लाख 50 हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे निदर्शनास आले.  घरातील एका खोलीत असलेल्या मिनी पोस्ट ऑफीसमध्ये परिसरातील खातेदारांनी दिवसभरात भरलेले 15 हजार रुपयेही लंपास केले. सकाळी सोलापूरहून श्‍वान मागविण्यात आले. मात्र श्‍वान घराभोवतीच फिरुन थांबले. या घरफोडीबाबत कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ईश्‍वर ओमासे तपास करीत आहेत.