होमपेज › Solapur › मोहोळमध्ये पुन्‍हा चोरी; २.५ लाखांच्या दागिन्यांची बॅग लंपास

मोहोळमध्ये पुन्‍हा चोरी; २.५ लाखांच्या दागिन्यांची बॅग लंपास

Published On: Aug 14 2018 10:58PM | Last Updated: Aug 14 2018 10:58PMमोहोळ : वार्ताहर

मोहोळ शहरातील एका सराफाची सोने-चांदीच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. सदर बॅगमध्ये तब्बल अडीच लाख रुपयांचा ऐवज होता. ही घटना मंगळवारी १४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता सिद्धार्थनगर मोहोळ येथे घडली. या प्रकरणी रात्री उशीरा मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, संजय श्रीहरी दीक्षित यांचे मोहोळ शहरातील सिद्धार्थनगर परिसरात गुरुकृपा नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. दररोज सकाळी साडेदहा वाजता ते दुकान उघडतात आणि रात्री सात वाजता बंद करतात. तसेच दुकानातील मौल्यवान दागिने ते एका बॅगमध्ये भरून घरी घेऊन येतात. १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता त्यांनी दुकानातील मौल्यवान दागिने बॅगमध्ये भरून दुकान बंद करून घरी आले होते. मंगळवारी १४ ऑगस्ट रोजी त्यांचा मुलगा सदरची बॅग घेऊन दुकान उघडण्यासाठी गेला. त्यावेळेस त्याने दुकान उघडून सदर बॅग लोखंडी शटर जवळ ठेऊन साफसफाई सुरू केली. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने सुमारे अडीच लाख रुपयांच्या सोने-चांदीच्या दागिन्यांची बॅग लंपास केली. बॅगमधील कपाटाची चावी काढण्यासाठी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

या प्रकरणी रात्री उशिरा मोहोळ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अन्वर मुजावर हे करीत आहेत. मात्र सलग दुसऱ्या दिवशी शहरातील सराफांच्या चोरीच्या घटनांमुळे सराफ व्यवसायीकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.