होमपेज › Solapur › शेगावमध्ये डांबून ठेवलेल्या मध्य प्रदेशातील 17 मजुरांची सुटका

शेगावमध्ये डांबून ठेवलेल्या मध्य प्रदेशातील 17 मजुरांची सुटका

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 9:20PMसोलापूर : प्रतिनिधी

मुकादम पैसे घेऊन पळून गेल्याने शेगाव (ता. अक्‍कलकोट) येथे डांबून ठेवलेल्या  मध्य  प्रदेशातील 17  जणांची सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे  शाखा  आणि अक्‍कलकोट  दक्षिण पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई बुधवारी दुपारी   करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये 3 पुरुष, 4 महिला व 10 मुलांचा समावेश आहे. याबाबत डांबून ठेवणार्‍या शेतकर्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महादेव गड्डी (रा. शेगाव, ता. अक्‍कलकोट) असे गुन्हा दाखल झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर जिल्ह्यातील वाबडीगावातील काही लोकांना साईनाथ नावाच्या मुकादमने चांगली  पगार  देण्याचे  आमिष  दाखवून गेल्या आठ दिवसांपूर्वी शेगाव येथील महादेव  गड्डी यांच्या शेतात आणून ठेवले होते. त्यानंतर काही दिवसांतच साईनाथ गड्डी यांच्याकडून पैसे   घेऊन  पळून  गेला. त्यामुळे  गड्डी  या  शेतकर्‍याने मध्य प्रदेशातून आलेल्या सर्वांना त्याच्या शेतामध्ये ऊसतोडीचे काम करून घेण्यास सुरुवात केली. काम झाल्यानंतर शेतकरी या सर्वांना खोलीमध्ये डांबून ठेवत असे. त्यामुळे त्या लोकांनी मध्य प्रदेशातील त्यांच्या नातेवाईकांना फोन करून सर्व हकीकत सांगितली. 

त्यामुळे मध्यप्रदेशातील त्या लोकांच्या नातेवाईकांनी तेथील एका स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली. त्या स्वयंसेवी संस्थेने मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने शेगाव येथील गड्डी यांच्या शेतातील खोल्यांमध्ये बुधवारी दुपारी छापा मारला. त्यावेळी खोल्यांमध्ये मध्य प्रदेशातील लोकांना डांबून ठेवल्याचे दिसून आले. पोलिसांनी गड्डी यांच्या शेतातील खोल्यांमधून 3 पुरुष, 4 महिला व 10 मुलांची सुटका करून स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यात दिले. याबाबत महादेव गड्डीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.