Sat, Apr 20, 2019 08:11होमपेज › Solapur › २९ हजार शेतकर्‍यांच्या नावे १७ कोटी जमा

२९ हजार शेतकर्‍यांच्या नावे १७ कोटी जमा

Published On: Jan 06 2018 1:28AM | Last Updated: Jan 05 2018 9:02PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी 

राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनाचा लाभ आता जवळपास 60 टक्के शेतकर्‍यांना झाला असून यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांही आता पुढे आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 29 हजार 827 शेतकर्‍यांच्या नावे आजपर्यंत 17 कोटी 84 लाख 31 हजार 890 रुपये जमा झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांकडून 29 हजार शेतकर्‍यांनी विविध पिकांसाठी कर्ज घेतले होते. सुरुवातीला राष्ट्रीयीकृत बँकांची माहिती वेळेवर मिळत नव्हती, त्यामुळे या बँकेतील शेतकर्‍यांना कर्जमाफी कधी मिळणार, असा प्रश्‍न सातत्याने उपस्थित केला जात होता. यावर जिल्हाधिकार्‍यांनी अनेकवेळा बैठका घेऊन राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जमाफीची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार कर्जमाफीच्या कामात आता राष्ट्रीयीकृत बँकाही पुढे आल्या आहेत. तरीही आणखी काही बँकांची माहिती उपलब्ध झालेली नाही. आजपर्यंत दीड लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज असलेल्या 23 हजार 83 शेतकर्‍यांच्या नावे 1 कोटी 62 लाख 61 हजार 238 रुपये जमा करण्यात आले आहेत. तर ओटीएस अर्थात दीड लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकर्‍यांची संख्या खूपच कमी आढळून आली आहे, तर प्रोत्साहनपर अनुदानासाठी 6 हजार 742 शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांच्यासाठी 15 कोटी 76 लाख 8 हजार 65 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 70 टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असल्याने अनेक शेतकर्‍यांनी याविषयी समाधान व्यक्त केले आहे.

शेतकर्‍यांच्या नावे जमा केलेल्या  बँकांमध्ये अलाहाबाद बँक, आंध्रा बँक, अ‍ॅक्सीस बँक, बडोदा बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, देना बँक, एचडीएफसी बँक, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, पंजाब बँक, आरबीएल बँक, स्टेट बँक, सिंडीकेट बँक, युको बँक, युनियन बँक, विदर्भ बँक, विजया बँकेचा समावेश आहे. तरी कर्जदार शेतकर्‍यांनी बँकेत जाऊन खात्री करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी केले आहे.