Thu, Apr 25, 2019 15:55होमपेज › Solapur › राज्यात 159 तूर खरेदी केंद्रे; सोलापूरला ठेंगा

राज्यात 159 तूर खरेदी केंद्रे; सोलापूरला ठेंगा

Published On: Feb 02 2018 11:46PM | Last Updated: Feb 02 2018 11:45PMसोलापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाने राज्यात 159 तूर खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. सोलापूर जिल्ह्यात तूर उत्पादक शेतकर्‍यांची संख्या जास्त आहे. या शेतकर्‍यांनी आधारभूत दराने विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणीही केली आहे. सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख यांच्यात जिल्ह्यात तूर खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली नसल्याने त्यांच्या भूमिकेबाबत शेतकर्‍यांतून तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहेत. 
 

राज्यात सन 2017-18 या हंगामासाठी नाफेडमार्फत तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. आधारभूत दराने तूर खरेदीला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. राज्यात 159 खरेदी केंद्रे उघडण्यात आली असून जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी खरेदी केंद्रांवर नोंदणी करून तूर खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.तूर खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी शेतकरी नोंदणी आवश्यक असून त्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकर्‍यांना खरेदी केंद्रावर अथवा बाजार समिती आवारात जावे लागू नये यासाठी मंडळ स्तरावर अथवा मोठ्या गावांमध्ये तुरीची नोंदणी करण्याचे राज्य शासनाने निश्‍चित केले आहे. 

नोंदणीच्या वेळी शेतकर्‍यांनी आधारकार्डची छायांकित प्रत, सुरू असलेल्या बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत अथवा त्या खात्याचा रद्द केलेला धनादेश (चेक), सात-बारा उतारा आदी कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांना खरेदीचे चुकारे ऑनलाईन बँक खात्यात होणार असल्यामुळे बँक खात्याची नोंदणी अचूक करावी. राज्यात नागपूर (9), वर्धा (7), अमरावती (9), अकोला (5), वाशिम (4), यवतमाळ (11), बुलडाणा (11), नांदेड (8), परभणी (6), हिंगोली (5), औरंगाबाद (4), बीड (12), जालना (9), लातूर (9), उस्मानाबाद (9), अहमदनगर (9), धुळे (2), नंदूरबार (8), सांगली (1), सातारा (1), पुणे (1), चंद्रपूर (4), जळगाव (9), नाशिक (4) आदी जिल्ह्यांत एकूण 159 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.