सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांसाठी देण्यात आलेल्या 1713 थकीत वीज कनेक्शनपैकी 1575 वीज कनेक्शन कट करण्यात आली आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागातील लोकांना आता पाणीटंचाईला सामोर जावे लागणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्यासाठी वीज वितरण विभागाच्या वतीने कनेक्शन देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 1713 कनेक्शन थकीत आहेत. त्यांच्याकडे जवळपास 35 कोटी 91 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे वारंवार वीज बिल भरण्याविषयी सूचना करुनही ग्रामपंचायतींनी वीज बिल भरले नाही. त्यामुळे 1575 वीज कनेक्शन खंडित करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांना आता ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईला सामोर जावे लागणार आहे. अनेक ग्रामपंचायतींचे उत्पन्न कमी आहे.
त्यामुळे वीज बिल भरण्याची त्यांची ऐपत नाही, तर याबाबतीत वीज वितरण विभाग ऐकण्यास तयार नाही. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून शासन दरबारी हे तोडण्यात आलेले वीज कनेक्शन जोडण्याबाबत पाठपुरावा करु, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी यावेळी दिले आहे. वीज विरतण कंपनीकडेही काही ग्रामपंचायतींची देणी आहेत. वीज वितरण कंपनी ग्रामपंचायतीच्या हद्दीत आपला व्यवसा करते.
त्यापोटी भाडेअकारणी करण्यात येते. त्याची रक्कम किती आहे याची माहिती मागविण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष शिंदे यांनी यावेळी दिली आहे. शासनाच्या आदेशान्वये थकीत वीज बिलाचे समप्रमाणात किमान पाच हप्ते पाडून ते बिल भरण्याची सुविधा वीज वितरण विभागाकडून करुन देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेकडून ज्या ग्रामपंचायती नियमित वीज बिल भरतात त्यांना शासनाकडून वीज बिल भरण्यासाठी 50 टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. त्याचेही प्रस्ताव मागविण्यात आले असल्याचे जि.प. अध्यक्ष शिंदे यांनी यावेळी सांगितले.
वाखरी ग्रामपंचायतीसाठी दोन कोटींची पाणी योजना
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत पंढरपूर तालुक्यातील वाखरी ग्रामपंचायतीला सन 2017-18 या आर्थिक वर्षात 1 कोटी 96 लाख रुपयांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून त्यासाठी जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. पालखी मार्गावरील महत्त्वाची ग्रामपंचायत असल्याने यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी दिली आहे.