Tue, Jun 18, 2019 20:53होमपेज › Solapur › अद्यापही 1,423 मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

अद्यापही 1,423 मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:52PM

बुकमार्क करा
सोलापूर : अमोल व्यवहारे

सोलापूर जिल्ह्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयातील  1423    मागासवर्गीय विद्यार्थी हे अद्यापही  शिष्यवृत्तीपासून दूर आहेत. समाजकल्याण विभागाकडून महाविद्यालयांना वारंवार सूचना देऊनही महाविद्यालयांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज समाजकल्याणकडे पाठविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गत दोन वर्षातील शिष्यवृत्तीचा लाभ 1423 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळालेला नाही.

सोलापूर जिल्ह्यात सुमारे 120 महाविद्यालये असून त्यापैकी 18 नामांकित महाविद्यालयाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबतचे प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून वारंवार पत्रव्यवहार करुनही समाजकल्याण खात्याला मिळालेले नाहीत. 

त्यामुळे या विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागामार्फत मिळणार्‍या शिष्यवृत्तीचा लाभ अद्यापपर्यंत घेता आलेला नाही. मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी भरलेले शिष्यवृत्तीचे अर्ज हे अद्यापही महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत. समाजकल्याण विभागाकडील शिष्यवृत्तीसाठीचे संकेतस्थळ हे काही मर्यादित कालावधीसाठीच सुरु असल्याने महाविद्यालयीनस्तरावरील विद्यार्थ्यांचे अर्ज जिल्हास्तरावर ऑनलाईन पाठविण्यासाठी समाजकल्याणकडून आवाहन करण्यात   आले होते. परंतु, जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयाकडून याला अल्प प्रतिसाद  देण्यात  आला.  त्यामुळे अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकलेली नाही. त्यामुळे समाजकल्याण विभागाकडून प्रलंबित असलेल्या महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्तीच्या अर्जाचे जाहीर प्रसिद्धीकरण करावे लागले आहे.  समाजकल्याणचे संकेतस्थळ बंद होऊन मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्याची असल्याचा असणार आहे.

सन 2015-16 आणि 2016-17 या वर्षातील महाविद्यालयातील प्रलंबित अर्ज पुढीलप्रमाणे (कंसात अर्जाची संख्या) ः हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर (91), कुचन हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, सोलापूर (144), संगमेश्‍वर कॉलेज, सोलापूर (151), माऊली कॉलेज, वडाळा (58), एस. एम. शंकरराव मोहिते-पाटील विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, वेळापूर (41), दिलीपराव सोपल ज्यु. कॉलेज, सुर्डी ता. बार्शी (82), स्व. स्वर्णलता गांधी कॉलेज, वैराग, ता. बार्शी (105), आण्णासाहेब पाटील ज्यु. कॉलेज, सोलापूर (55), शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज, सोलापूर (82), डी. बी. एफ. दयानंद कॉलेज आर्टस आणि सायन्स, सोलापूर (91), पंडित दीनदयाल उपाध्याय दंत महाविद्यालय, सोलापूर (36), डॉ. चंद्रभाऊ सोनवणे ज्यु. कॉलेज, उक्कडगाव, ता. बार्शी (90), श्रीमान झाडबुके कॉलेज, झाडबुके मार्ग ता. बार्शी (73), ए. डी. जोशी ज्यु. कॉलेज, सोलापूर (43), वामनराव माने प्रशाला आणि ज्यु. कॉलेज, पंढरपूर (62), महाराष्ट्र स्टेट टेक्नीकल हायस्कूल कम ज्यु. कॉलेज, सोलापूर (97), एस.एस.पी. एम. कॉलेज ऑफ एज्यु. बार्शी (31), कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, पंढरपूर (91).