Thu, Apr 25, 2019 05:24होमपेज › Solapur › 1992 बॅचच्या 14 जणांना मिळाली 2004  ची ज्येष्ठता

1992 बॅचच्या 14 जणांना मिळाली 2004  ची ज्येष्ठता

Published On: Mar 21 2018 12:24AM | Last Updated: Mar 21 2018 12:24AMसोलापूर : अमोल व्यवहारे

महाराष्ट्र पोलिस दलातील सन 1992 च्या थेट डीवायएसपी बॅचच्या 14 जणांना सन 2004 ची ज्येष्ठता देण्याचा निकाल ‘कॅट’ न्यायालयाने दिल्यानंतर पोलिस दलातील वरिष्ठांच्या बदल्यांच्या कामाला वेग आला आहे. गृहविभागाकडून वरिष्ठांच्या बदल्यांच्या फायलींवर शेवटचा हात फिरविण्यात येत असून लवकरच वरिष्ठांच्या बदल्या जाहीर होणार आहेत.  कॅटच्या निकालानंतर  मपोसे अधिकार्‍यांना न्याय मिळाला आहे.

सन 1992 च्या थेट डीवायएसपीच्या  बॅचमधील  14 जणांना 1 जानेवारी 2017 रोजी  ‘सिलेक्शन  ग्रेड’ (सेवाज्येष्ठता) मिळाली    आहे. यामध्ये  गायकर, सुनील  फुलारी, संजय मोहिते, दत्ता  कराळे, प्रवीण पवार, डॉ. प्रभाकर  बुधवंत, सुप्रिया पाटील, अनंत रोकडे, अमर जाधव, संजय बावीस्कर, शेखर, आर. पी. नाईकनवरे आदी अधिकार्‍यांचा  समावेश आहे.  शासनाने या  अधिकार्‍यांना  सन 2005 ची ज्येष्ठता दिली आहे.

या अधिकार्‍यांना नियमानुसार 1 जानेवारी 2018 रोजी पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळणे गरजेचे होते. त्यामुळे या अधिकार्‍यांमधील  काही  अधिकार्‍यांनी शासनाच्या निर्णयाविरोधात ‘कॅट’ न्यायालयात धाव घेतली. सुनावणीअंती ‘कॅट’ न्यायालयाने सन 1992 च्या थेट डीवायएसपी बॅचमधील 14 अधिकार्‍यांना सन 2004 ची  ज्येष्ठता देण्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे या अधिकार्‍यांना आता सन 2004  ची  ज्येष्ठता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

कॅट न्यायालयाच्या या निकालानंतर  महाराष्ट्र   पोलिस  दलातील  वरिष्ठ  पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांच्या कामाला वेग आला आहे. राज्यातील पुणे, औरंगाबाद, नागपूर, नवी   मुंबई, ठाणे शहर आयुक्‍तालयातील आयुक्‍तांची बदली होणार असून शासनाने पोलिस महानिरीक्षकांच्या 7 पदांना मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आता महानिरीक्षकांची 13 पदे झाली असून 11 पदे रिक्‍त आहेत तसेच  अतिरिक्‍त महांचालकांच्या  4 जागा रिक्‍त आहेत. या जागा पदोन्नतीने भरल्या जाणार असल्यामुळे ज्येष्ठता मिळालेल्या अधिकार्‍यांना याचा लाभ होणार आहे.  

सोलापूरचे  पोलिस  अधीक्षक एस. वीरेश प्रभू, पुण्याचे अधीक्षक सुवेज हक, संजय दराडे, शारदा राऊत, मनोज  शर्मा  यांना  सन 2005 ची ज्येष्ठता देण्यात आली आहे. परंतु कॅटच्या  निकालामुळे या अधिकार्‍यांना पदोन्नतीसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे मपोसे असलेले अधिकारी हे सिनियर झाले असून थेट आयपीएस  असणारे अधिकारी ज्युनियर झाले आहेत.

 

  Tags :  Seniority, Police Batch,  Home Minister , Solapur, Police Transfer