Thu, Jul 02, 2020 21:09होमपेज › Solapur › बारावी उत्तरपत्रिका तपासणी लांबणीवर

बारावी उत्तरपत्रिका तपासणी लांबणीवर

Published On: Apr 25 2018 11:55PM | Last Updated: Apr 25 2018 11:38PMसोलापूर ः प्रतिनिधी

विनाअनुदानित महाविद्यालयातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी प्राध्यापकांनी बारावी परीक्षा उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. यामुळे निकालास विलंब होत असल्याने पुणे परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुपे यांनी मंगळवारी संगमेश्‍वर महाविद्यालयात बैठक घेतली. या बैठकीत बोर्डाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांत खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

सोलापूर जिल्ह्यातील 107 कनिष्ठ महाविद्यालय अनुदान मिळण्यासाठी पात्र असतानाही केवळ एका शाळेतील तुकडीस अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे गत 18 वर्षांपासून बिनपगारी काम करणार्‍या प्राध्यापकांच्या कुटुंबीयांचे हाल होत आहेत. या शाळेस अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी बारावी परीक्षा पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मुख्याध्यापक संघाने व प्राध्यापक संघाने घेतला होता. 

परीक्षा तपासणीस विलंब होत असल्याने निकाल लांबणीवर पडत असल्याने पुणे विभागीय बोर्डाचे अध्यक्ष तुपे यांनी अखेर सोलापुरात येऊन संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांची बैठक संगमेश्‍वर महाविद्यालयात घेतली. विना अनुदानित महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भातचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला असल्याने पेपर तपासणी करण्यात यावे व 2 मेपर्यंत पेपर जमा करावेत, असे आवाहन त्यांनी या बैठकीत केले.