Tue, Mar 26, 2019 01:33होमपेज › Solapur › विठ्ठल भक्तांच्या सुविधांसाठी 11 कोटी

विठ्ठल भक्तांच्या सुविधांसाठी 11 कोटी

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 11:00PMसोलापूर ; संतोष आचलारे 

आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात दाखल होणार्‍या विठ्ठल भक्तांना किमान मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी यात्रीनिवास, भक्तनिवास व अन्य सोयीसुविधांची कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेने 10 कोटी 83 लाख 54 हजार 37 हजारांच्या कामांना कार्योत्तर मंजुरी दिली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या पुढाकारामुळे वारकर्‍यांना सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या सर्व कामांना आवश्यक मंजुरी देण्यात आली आहे. 

पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील खंडोबा मंदिर परिसरात पोहोच सिमेंट रस्ता करण्यासाठी 61 लाखांच्या कामास यावेळी मंजुरी देण्यात आली. गोपाळपूर येथे सिमेंट रस्ता व अन्य सुशोभिकरणाच्या कामांसाठी 79 लाखांच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. सरकोली येथील भैरवनाथ मंदिराच्या परिसरातील भक्तनिवास बांधणे, सरंक्षण भिंत व वाहनतळाच्या कामासाठी 1 कोटी 28 लाखांच्या निधी खर्चास कार्योत्तर मंजुरी देण्यात आली आहे. पुळूज येथील लिंगेश्‍वर मंदिरात संरक्षण भिंत घेणे, वाहनतळ, पोहोच रस्ता आदींसाठी 1 कोटी 83 लाख, मंगळवेढा तालुक्यातील मारोळी येथील बागडेबाबा देवस्थानात संरक्षण भिंत, यात्रीनिवास आदींसाठी 79 लाखांच्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली. पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सीताराम समाधी येथील भक्तनिवास, वाहनतळ आदी विधांसाठी 1 कोटी 49 लाख निधी खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. सांगोला तालुक्यातील शिरभावी येथील भगवानगिरी देवस्थानात भक्तनिवास उभारण्यासाठी 1 कोटी 49 लाख रुपयांच्या निधी खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. आवाटी श्री क्षेत्र हजरत सुफीवाले चाँदपाशा सुफीदर्गा येथील भक्तनिवास, स्वच्छतागृह व वाहनतळ येथील सुविधांसाठीही जिल्हा परिषदे सभेने 1 कोटी 35 लाख 43 हजारांच्या कार्योत्तर खर्चास मान्यता देण्यात आली आहे.