Fri, Jan 18, 2019 12:56होमपेज › Solapur › शाळेच्या वर्गातच विद्यार्थ्याचा खून

शाळेच्या वर्गातच विद्यार्थ्याचा खून

Published On: Feb 06 2018 6:06PM | Last Updated: Feb 06 2018 6:06PMनातेपुते : वार्ताहर 

पिरळे (ता. माळशिरस) येथील समता माध्यमिक विद्यालयातील इ. दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या महेश किसन कारंडे (वय 16) या विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गातील दोन मुलांनी विद्यालयातील संगणक रूममध्ये शाळा चालू असताना खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कोयत्याने वार करून खून केल्यानंतर हे दोन्ही आरोपी विद्यार्थी पळून गेले आहेत. या घटनेमुळे  शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

पिरळे येथील समता माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीची सराव परीक्षा चालू होती. याच वर्गात शिकत असलेली महेश कारंडे,  विश्वजीत बारिकराव यमगर व सतीश भुजाबा लोखंडे हे तीन विद्यार्थी गैरहजर असल्याचे वर्गशिक्षिकांच्या निदर्शनास आले. परंतु महेश कारंडे याचा शाळेच्या संगणक रुममध्ये रक्‍ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. शेजारी रक्‍ताने माखलेली 2 कोयते सापडले. यासंदर्भात महेशचे वडील किसन कारंडे यांनी संशयित आरोपी म्हणून दोन विद्यार्थ्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. 

हे वृत्त समजताच अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण, अकलूजचे पोलिस निरीक्षक अरुण सावंत, नातेपुते पोलिस स्टेशनचे सपोनि राजकुमार भुजबळ यांनी तातडीने घटना स्थळी धाव घेऊन गावात शांतता राखण्यासाठी ग्रामस्थांना आव्हान केले आहे.

पुढील तपास सपोनि राजकुमार भुजबळ करीत आहेत. संशयित आरोपींनी यमगर व लोखंडे यांनी यापूर्वीदेखील गावतील कालिदास नरळे यांना मारहाण केली होती. परंतु ग्रामस्थांनी हे प्रकरण गावातच मिटविले होते. या घटनेत आनेक प्रश्न निर्माण झाले असून शाळेत विद्यार्थी हत्यारे घेऊन येतात परंतु शिक्षकांना किंवा मुख्याध्यापक यांना तपास सुद्धा लागत नाही याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. तसेच दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याने या गुन्ह्यांचे गांभीर्य वाढले आहे. सोलापूर जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात पहिल्यांदाच अशा प्रकारची शालेय विद्यार्थ्यांकडून खुनाची घटना घडली असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.