होमपेज › Solapur › सोलापूर बंदला 100 टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर बंदला 100 टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On: Jul 31 2018 1:38AM | Last Updated: Jul 30 2018 10:27PMसोलापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी  मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्यावतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या सोलापूर बंदला 100 टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. व्यापारी, शाळा, महाविद्यालये,  मार्केट यार्ड, राज्य एसटी, मनपा शहर बससेवा, अनेक पेट्रोल पंप, किरकोळ विक्रेत्यांसह सर्वच समाजघटकांनी मराठा आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याने सोलापूर शहर कडकडीत बंद होते. दवाखाने, मेडिकलसह अत्यावश्यक सेवा मात्र सुरळीत होत्या. जिल्ह्यामध्येही मोहोळ, अक्कलकोट, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या चार तालुक्यांमध्ये बंद होता, तर उर्वरित तालुक्यांनी यापूर्वीच बंद यशस्वी केल्याने त्यांना या बंदमधून वगळण्यात आले होते. पंढरपूर तालुक्यात बंद नसला तरी रास्ता रोको आदी आंदोलने झाली.

होटगी, विजापूर रोडसह जुळे सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
आसरा चौक, होटगी रोड तसेच विजापूर रोड परिसरातील दुकानदारांनी बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत पाठिंबा दिला. आसरा चौकात दुकाने बंद करण्याचे आवाहन करणार्‍या 20 ते 25 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या परिसरात तणाव निर्माण झाला होता.

दुकानदारांचा उत्स्फूर्त सहभाग
या परिसरातील दुकानदारांनी बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. मात्र अत्यावश्यक सेवा म्हणून या परिसरातील मेडिकल तसेच खासगी दवाखाने सुरू होते. आसरा चौक तसेच भारती विद्यापीठ परिसरातील भाजी मंडई ओस पडली होती. या भागातील रिक्षाचालकांनीही बंदमध्ये सहभाग नोंदवला. 

पेट्रोल पंपधारकही सहभागी
जुळे सोलापूर परिसरातील ए.डी. जोशी पेट्रोल पंप तसेच होटगी रोड, आसरा चौक येथील पेट्रोल पंपधारकांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. विजापूर रोडवरील नडगिरी पेट्रोल पंप सुरू होता. तेथे पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या भागात हा एकमेव पेट्रोल पंप सुरू असल्याने मोठी गर्दी उसळली होती.

विद्यार्थ्यांची शाळांना दांडी
दोन दिवसांपूर्वीच हा बंद घोषित करण्यात  आल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवणे पसंत केले. या भागातील शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थी मात्र शाळांकडे फिरकले नाही. परिणामी तासाभरातच शाळांना सुटी देण्यात आली. 

आंदोलकांना घेतले ताब्यात
आसरा चौक परिसरातील सकाळी नऊच्या सुमारास काही दुकाने उघडी दिसताच आंदोलकांनी ही दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र पोलिसांनी यात हस्तक्षेप करीत घोषणा देणार्‍या 20 ते 25 आंदोलकांना ताब्यात घेतले. 
या आंदोलकांना विजापूर नाका पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे येथे मोठा तणाव निर्माण झाला होता. तासाभरात पोलिसांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने तणाव निवळला. परिसरात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. या भागात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

मार्केट यार्डात शेतकरी व अडतदारांचा उत्स्फूर्त बंद 
 मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका घेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व अडतदार व व्यापार्‍यांनी उस्फूर्तपणे व्यवहार बंद ठेवला. शेतकर्‍यांनीही कोणताच माल बाजार समितीत आणला नाही. यामुळे बाजार समितीमधील सुमारे 8 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. 

सकल मराठा समाज व  मराठा क्रांती  मोर्चाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी सोमवारी बंदची हाक देण्यात आली होती. शनिवार याबाबत बाजार समितीमधील भाजीपाला व भुसार अडतदारांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्धार व्यापारी व अडतदारांनी केला होता. ठरल्याप्रमाणेच सोमवारी बाजार समितीत कडकडीत शंभर टक्के बंद दिसून आला. एरवी पाय ठेवायलाही जागा नसणारा भाजीपाला, फळ विभाग व कांदा विभागात दिवसभर पूर्णपणे शुकशुकाट दिसून आला. 

मराठा समाजासह अन्य समाजालाही आरक्षण मिळावे यासाठी  फळ, कांदा व भाजीपाला विभागांतील एक हजार अडतदारांनी बंदमध्ये सहभाग घेतला आहे. यामुळे सुमारे तीन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी आपला पूर्ण पाठिंबा असल्याने बंद उत्स्फूर्तपणे पाळण्यात आल्याची प्रतिक्रिया येथील अडतदार असोसिएशनचे नेते रियाज बागवान यांनी दिली. 

भुसार अडतदार संघाचे अध्यक्ष प्रभाकर विभुते यांनी केलेल्या आवाहनानुसार येथील भुसार अडतदारांनीही शंभर टक्के बंदमध्ये सहभागी होत दुकाने बंद ठेवली. या विभागातील सुमारे तीन ते चार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले. एरवी माल वाहतूक वाहने, हमाल, तोलार, खरेदीदार व शेतकर्‍यांनी गजबजणारी ही बाजारपेठ बंदमुळे सामसुम दिसून आली होती. व्यापार्‍यांनी बंदमध्ये उस्फूर्तपणे सहभागी घेतल्याने अन्य किरकोळ विक्रेत्यांनीही आपला व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर हैदराबाद रोडवर असणार्‍या सर्व गाळ्यांतील व्यापार्‍यांनीही बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत मराठा समाजाच्या आरक्षणाला एकमुखी पाठिंबा दिला. यामुळे येथीलही सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका सर्वच समाजातील व्यापारी, अडतदार व अन्य वर्गांनी घेतल्याने बंदला स्वयंप्रेरणेने शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिवसभर बाजार समितीच्या आवारात दिसून आले. 

गादेगाव, देगाव, शेळवे, वाखरीत बंद
पंढरपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील गादेगाव, देगाव, शेळवे, वाखरी, गोपाळपूर  आदी गावांतून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा आरक्षण मागणीसाठी विविध प्रकारे आंदोलने करण्यात आली. सोलापूर जिल्हा बंदमध्ये पंढरपूर शहर आणि तालुक्याने सहभाग नोंदवला नाही. त्यामुळे पंढरपूर शहरातील सर्व कामकाज आणि जनजीवन नेहमीप्रमाणे चालू होते. मात्र ग्रामीण भागात आंदोलनाची धग कायम असल्याचे दिसून आले. याशिवाय अनेक गावांतून आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे दिसून येते. 

गादेगाव  येथे  संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले. जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करून गावातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. स्मशानभूमीत ही अंत्ययात्रा नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शेळवे येथे गाव बंद ठेवण्यात आले तसेच गावातील शाळा, विद्यालये बंद ठेवण्यात आली. देगाव  येथे संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले आणि रस्त्यावर टायर्स पेटवून पंढरपूर-सुस्ते मार्गावरील वाहतूक काही काळ बंद पाडण्यात आली.  गोपाळपूर येथे गोपाळकृष्ण मंदिरासमोरील चौकात ठिय्या आंदोलन  करण्यात आले. 

पंढरपूर शहरात कुठेही काही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र शांततेत जनजीवन सुरू असल्याचे दिसून येते. 2 ऑगस्टपासून पंढरपूर शहरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरू होणार असून त्यानंतर 9 ऑगस्टपर्यंत संपूर्ण तालुक्यातील गावांचे तहसीलसमोर ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. 

पूर्व भागात कडकडीत बंद पाळून प्रतिसाद
मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या सोलापूर बंदला पूर्व भागात चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व ठिकाणी कडकडीत बंदचे चित्र होते. 

सकाळी साडेअकरा वाजता माकपाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी पूर्व भागातील दुकाने बंद करण्याचे आवाहन करुन घोषणाबाजी चालू केली. त्यांच्यासोबत जवळपास दीडशेच्यावर कार्यकर्ते होते. सोलापूरला माकपच्यावतीने पाठिंबा जाहीर केला. बंद यशस्वी करण्यासाठी पूर्व भागातील एमआयडीसी परिसर, विडी कारखाने, दुकाने सकाळपासून बंद केली होती. दुपारी 12 च्या  सुमारास  दत्तनगरातील लाल बावटा कार्यालयापासून अशोक चौक, वालचंद कॉलेज, लोकमान्य चौक, सत्तर फूट भाजी मंडई येथे माजी आमदार आडम मास्तर यांनी दुकाने बंद करुन, शांततेचे आवाहन करुन घोषणाबाजीस सुरुवात केली. यावेळी  जेलरोड पोलिस ठाण्याचे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम अभंगराव यांनी आडम मास्तरांसह एम.एच. शेख,  सलीम पटेल, अनिल वासम,  विक्रम कलबुर्गी व अन्य 70 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सायंकाळी सोडून देण्यात आले. 

 सिद्दप्पा कलशेट्टी,  युसूफ मेजर,  विल्यम ससाणे,  सलीम मुल्ला,  कुरमय्या म्हेत्रे, नसीमा शेख, शेवंता देशमुख,  लिंगव्वा सोलापुरे,  बापू साबळे, मुरलीधर सुंचू, वसीम मुल्ला,  वसीम देशमुख, सनी शेट्टी, नरसिंग म्हेत्रे, किशोर मेहता, बाबू कोकणे, मोहन कोक्कुल, दीपक निकंबे, दीपक म्हंता, सनी कोंडा, बालकृष्ण मल्याळ, हसन शेख, विजय हरसुरे, दौला बागवान, श्रीनिवास गड्डम,  मधुकर चिल्लाळ आदींसह  70 च्या वर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.