Sun, Jun 16, 2019 12:11
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › ग्रामीण गुन्हे शाखेने वर्षांत पकडले १०० गुन्हेगार सोलापूर : अमोल व्यवहारे

ग्रामीण गुन्हे शाखेने वर्षांत पकडले १०० गुन्हेगार सोलापूर : अमोल व्यवहारे

Published On: Dec 20 2017 1:47AM | Last Updated: Dec 19 2017 9:58PM

बुकमार्क करा

चालू वर्षात सोलापूर ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोेलिसांनी जिल्ह्यात घडलेले अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच सुमारे 85 गुन्हे  उघडकीस  आणून त्यामधून चोरीस  गेलेल्या 1  कोटी  15 लाखांच्या मुद्देमालापैकी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच अनेक गंभीर  गुन्ह्यांतील  सुमारे 100 आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविल्याचे उघड झाले आहे. 

सोलापूर   ग्रामीणच्या  स्थानिक  गुन्हे   शाखेकडून   चालू  वर्षात  उघडकीस आणलेले गुन्हे पुढीलप्रमाणे (कंसात गुन्ह्यांची संख्या व अटक आरोपी) ः खून (1 गुन्हा व 1 आरोपी), खुनाचा प्रयत्न (1 गुन्हा व 1 आरोपी), दरोडा (10 गुन्हे व 16 आरोपी),  दरोड्याची तयारी (1 गुन्हा व 3 आरोपी), जबरी चोरी (1 गुन्हा व 5 आरोपी), घरफोडी (1 गुन्हा व 1 आरोपी), चोरी (39 गुन्हे व 25 आरोपी), फसवणूक (1 गुन्हा व 1 आरोपी), आर्म अ‍ॅक्ट (2 गुन्हे 2 आरोपी), अपहरण (1 गुन्हा व 3 आरोपी), खंडणी (2 गुन्हे व 4 आरोपी), आरोपी पलायन (1 गुन्हा 3 आरोपी), पाहिजे असलेले आरोपी (14 आरोपी).

स्थानिक गुन्हे शाखेकडून उघडकीस आणलेल्या विविध गुन्ह्यांत गेलेला मुद्देमाल (कंसात जप्त केलेला मुद्देमाल) पुढीलप्रमाणे ः दरोडा - गेला माल 44 लाख 6 हजार 934  रुपये (जप्त  माल  40 लाख 24 हजार 734), जबरी चोरी - गेला माल 25 हजार 550 रुपये (जप्त माल 19 हजार 950 रुपये), घरफोडी - गेला माल 27 लाख 69 हजार 808 रुपये (जप्त माल 14 लाख 68 हजार 233 रुपये),  चोरी - 1 कोटी 95 लाख 6 हजार 900 रुपये (जप्त माल 30 लाख 40 हजार 400 रुपये).

स्थानिक गुन्हे शाखेकडून उघडकीस आणलेल्या गंभीर गुन्ह्यांची  माहिती ः करमाळा पोलिस ठाणे - दीपक लालसिंह चव्हाण (रा. मध्य प्रदेश) एमपी 09 एचएच 7871 ट्रकमधून हरभरा डाळ घेऊन जाताना त्यांना अडवून धमकी देऊन 33 लाख 99 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. तो गुन्हा उघडकीस आणून बंडू दाम माशाळ (रा. दायटी तळ, सांगोला)व बंटी जालिंधर बंदरे (रा. चिलवडी) यांना अटक करून त्यांच्याकडून चोरलेला हरभरा व ट्रक असा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. 

टेंभुर्णी पोलिस ठाणे-  दरोड्याच्या तयारीत असताना राहुल जिगर्‍या काळे, लखन उर्फ लख्या जिगर्‍या काळे आणि किरण ऊर्फ खोब्या जिगर्‍या काळे (रा. दहिगाव, ता. करमाळा) यांना अटक केली. तर त्यांचे साथीदार पप्पू नीळकंठ काळे  (रा. निमगाव डाकू, जि. अहमदनगर), सागर उचल्या भोसले (रा. टाकळी शिवार) हे दोघे पळून गेले. 

अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे- कडबगाव  शिवारात राजू बनसिद्ध जेऊरे (वय 35) याच्या खूनप्रकरणी त्यांचाच चुलत भाऊ इराप्पा जेऊरे यास अटक केली.माळशिरस  पोलिस ठाणे- अर्जुन वसंत मिसाळ (रा. रणजित कॉलनी, सदाशिवनगर, ता. माळशिरस) यांच्या डोळ्यात चटणी टाकून दरोडेखोरांनी हिशोबातील 4 लाख 18 हजार 500 रुपयांची  रोकड लुटली होती. याप्रकरणी पोलिसांनी  दीपक उर्फ दादा साधू आवटे (रा. मोरोची), सागर पोपट मदने (वय गुणवरे), सूरज महादेव चव्हाण (रा. मोरोची), महेश बाळासाहेब अभंगराव (रा. निभोरे), विशाल संजय मसुगडे (रा. धर्मपुरी), सुनील महादेव मदने (रा. मोरोची) यांना अटक करुन 100 टक्के माल हस्तगत केला.  

बार्शी पोलिस ठाणे - बार्शीतील प्रसिद्ध शिक्षक मधुकर गणपत डोईफोडे हे मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले. या संवेदनशील गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी रामा राजेंद्र साडेकर (रा. माळी गल्ली, परांडा), सोमनाथ रामलिंग    भोसले (रा. चिंचगाव, माढा), आप्पासाहेब   रामचंद्र राऊत (रा. म्हैसगाव,  माढा)  यांना  अटक करून   त्यांनी  25 लाखांच्या  खंडणीसाठी अपहरण केल्याचे उघडकीस आणले. 

मंद्रुप पोलिस ठाणे- दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे लाड्या रामा भोसले (रा. जामगाव, मोहोळ) या आंतरराज्य गुन्हेगारास अटक करून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

सांगोला पोलिस ठाणे- तेलंगणा सरकारमधील डॉ. तिरुपती यांचे 10 लाख रुपयांच्या खंडणीसाठी झालेल्या अपहरणप्रकरणी  रामचंद्र महादेव कबाडे (रा. एकतपूर), कृष्णा विठोबा गडदे (रा. बेहरे चिंचोली), पांडुरंग महादेव कबाडे आणि प्रकाश मधुकर खटके (रा. वासुदे) यांना अटक करून डॉ. तिरुपती यांची सुखरुप सुटका केली. 

सांगोला पोलिस ठाणे- सांगोला येथील ओमकार ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून तिजोरी गॅस कटरने तोडून 16 किलो चांदीचे दागिने चोरून नेल्याप्रकरणातील गुन्ह्यात झारखंडमधील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.