Sun, Jul 21, 2019 16:26
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › दर्शन रांगेत 10 वॉटरप्रूफ दर्शन शेड

दर्शन रांगेत 10 वॉटरप्रूफ दर्शन शेड

Published On: Jul 08 2018 1:46AM | Last Updated: Jul 07 2018 11:52PMपंढरपूर : प्रतिनिधी 

15 दिवसांवर आलेल्या आषाढी यात्रेची पूर्व तयारी विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्यावतीने सुरु असून  भाविकांच्या सोयीसाठी 4 कि. मी. पर्यंत दर्शनरांगेचे नियोजन केले जात आहे. पावसापासून सुरक्षितता मिळावी म्हणून कायमस्वरूपी 4 आणि तात्पुरते वॉटरप्रुफ 6 शेड उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 

आषाढी यात्रा ही वर्षभरातील मुख्य चार यात्रांपैकी एक महत्वाची यात्रा आहे. या यात्रेस 12 ते 15 लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार मंदिर प्रशासनाच्यावतीने तयारी करण्यात येत आहे.  भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेता मंदीर प्रशासनाच्यावतीने दर्शन मंडप ते चंद्रभागा घाट दरम्यान स्काय वॉक उभारला आहे. तर चंद्रभागा घाट (सारडा भवन) ते पत्राशेड 650 मीटर व पत्राशेड ते गोपाळपूर 650 मीटर व गोपाळपूर ते श्री विठ्ठल इंजिनिअरींग कॉलेज  अडिच किलोमीटर या दरम्यान सुमारे पावणे चार किमीची दर्शन रांग उभारण्यात येत आहे.

येथे कायम स्वरूपीचे 4 पत्राशेड आहेत तर या दर्शन शेडमध्ये बॅरेकेटिंग करण्यात आले आहे. दर्शन शेडमध्ये आतून रंगीत  मंडप व झालर उभारण्यात आली आहे. तर पत्राशेड शेजारी तात्पुरते 6 दर्शन मंडप उभारण्यात आले आहेत. दर्शन रांग व दर्शन मंडप वॉटरप्रुफ बनवण्यात आल्याने पावसातही भाविकांना अखंडपणे दर्शन रांगेत उभे राहता येणार आहे. वॉटरप्रुफ दर्शन रांग व दर्शन मंडपासाठी 2 हजार पत्रे, 7 हजार वासे, 13 हजार बांबू,  2 हजार लोखंडी पाईप, 3 हजार फुट बॅरेकेटींगच्या जाळ्यांचा वापर करण्यात आला आहे. 

उभारण्यात आलेल्या शेड व दर्शन रांगेत कापडी मंडप व झालर लावण्यात आली आहे. या 10 दर्शन शेडमध्ये 80 हजार भाविक सामावण्यची क्षमता आहे. ऊन, वारा, पाऊस, अंधार, आपतकालीन परिस्थिती याचा विचार करुन वरिष्ठांच्या सुचनेनुसार दर्शन मंडप  व रांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दोन दिवसांत काम पुर्ण होणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.

साऊंड सिस्टीम व लखलखत्या प्रकाशाची सोय
भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या दर्शन रांगेत व दर्शन मंडपात एकूण 450 ट्युब व बल्ब, 100 मेटल लावण्यात येत असल्याने परिसर प्रकाशमय होणार आहे. दोन जनरेटर व प्रत्येक शेडला साऊंड सिस्टीम बसवण्यात येणार आहे. तसेच एल.ई.डी. स्क्रीनही उभारण्यात येत असून त्यावर थेट विठ्ठलचे लाईव्ह दर्शन होणार आहे.