होमपेज › Solapur › अकलूजमध्ये पाठलाग करून एक लाखाची रोकड लंपास

अकलूजमध्ये पाठलाग करून एक लाखाची रोकड लंपास

Published On: Feb 28 2018 1:11AM | Last Updated: Feb 27 2018 9:04PMअकलूज : वार्ताहर

बँकेतून काढलेली एक लाख दहा हजार रुपयांची रोकड घेऊन नानासाहेब एकतपुरे हे मोटारसायकलवरुन घराकडे जात असताना यशवंतनगर (देशमुख मळा) येथे रस्त्यावरुन तोंडाला रुमाल बांधून मोटारसायकलवर आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी पैशाची पिशवी हिसकावून घेऊन पलायन केल्याची घटना  सोमवारी दुपारी 12.45 वा. सुमारास घडली. 

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, नानासाहेब मारुती एकतपुरे (रा. यशवंतनगर) यांनी सोमवार, 26 रोजी कॉर्पोरेशन बँकेतून काढलेली 1,10,000 रुपयांची रोकड पिशवीत ठेवून मोटारसायकलवरुन घराकडे निघाले होते. बँकेतून घराकडे जाताना यशवंतनगर (देशमुख मळा) येथे पुतण्या निवृत्ती एकतपुरे यांच्या घराजवळ आले असता पाठीमागून दोन मोटारसायकलवरुन आलेल्या  30 ते 35 वयाच्या दोन व 20 ते 22  वर्षाच्या दोन अज्ञात चोरट्यांनी एकतपुरे यांच्या मोटारसायकलच्या हँडेलला अडकवलेली पिवळ्या रंगाची पैशाची पिसवी हिसका मारुन काढून घेत पसार झाले. एकतपुरे यांच्यावर अचानक आलेल्या प्रसंगानंतर त्यांनी आरडाओरड करुन पुतण्याला बोलवले. तोपर्यंत चोरटे पैशाची पिशवी घेऊन पसार झाले होते. चोरीची घटना घडल्यानंतर चोर हे बँकेपासूनच पाठलाग करुन चोरीच्या प्रयत्नात असल्याचे एकतपुरे यांच्या लक्षात आले.

घटनेची माहिती मिळताच अकलूज पोलिस ठाण्याचे पो.नि.अरुण सावंत यांनी घटनास्थळापासून ते बँकेपर्यंत पाहणी करुन विशेष पथकास तपासाच्या सूचना दिल्या. कॉर्पोरेशन बँक ते घटनास्थळापर्यंत रस्त्यावरील सर्व सीसीटीव्हीचे रेकॉर्ड तपासून चोरांना पकडण्यासाठी पोलिस यंत्रणा काम करत होती.