Tue, Jan 21, 2020 10:15होमपेज › Solapur ›  पंढरपूर, सांगोला, माढा, मोहोळ, मंगळवेढा तालुक्यांतील शासकीय कर्मचार्‍यांचाही सहभाग

पंढरीत लोकसहभागातून आज ‘महास्वच्छता’ अभियान

Published On: Jul 19 2019 9:22PM | Last Updated: Jul 19 2019 9:22PM
पंढरपूर : प्रतिनिधी

आषाढी यात्रा संपल्यानंतर पंढरपूर शहर आणि वाखरी पालखी तळावरील स्वच्छतेसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज (शनिवार, 20 रोजी) ‘महास्वच्छता’ अभियान आयोजित करण्यात आलेली आहे. या अभियानामध्ये पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, सांगोला आणि माळशिरस तालुक्यांतील शासकीय, निमशासकीय आणि सामाजिक, सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा  सहभाग असणार आहे. 

आषाढी यात्रेचा सोहळा 16 जुलै रोजीच संपला असून आता पंढरपूर शहरातील सर्व वारकरी परत गेलेले आहेत. मात्र, यात्रेमुळे शहराच्या विविध भागांत पडलेला कचरा, घाण  उचलणे आणि सफाईचे काम अजूनही सुरूच आहे. पंढरपूर नगरपालिकेचे कायमस्वरूपी आणि हंगामी असे सुमारे 1200 पेक्षा जास्त कर्मचारी काम करीत असूनही अद्याप शहराच्या अनेक भागांत कचरा पडून आहे. स्वच्छतेची गरज अजूनही शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे. 

विठ्ठल मंदिर परिसर, वाळवंट या भागांत बर्‍यापैकी स्वच्छता झालेली असली तरी उपनगरी भागांत मात्र स्वच्छतेची अजूनही आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर, सागोंला, मंगळवेढा, माढा तालुक्यांतील सर्व शासकीय, निमशासकीय विभागांच्या कर्मचार्‍यांकडून स्वच्छतेचे काम करून घेतले जाणार आहे. त्याकरिता या चारही तालुक्यांतील कर्मचार्‍यांना स्वच्छतेसाठी विभाग वाटून दिलेले आहेत.  

पंढरपूर शहर आणि मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्गातील स्वच्छता पंढरपूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, सामाजिक संघटना, विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. या परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी पंढरपूरचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे सोपवली आहे. वाखरी पालखी तळासाठी मंगळवेढा तहसीलदार स्वप्नील राबडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा तालुक्यातील कर्मचार्‍यांना स्वच्छतेसाठी नियुक्त केलेले आहे. 

पंढरपूर शहरातील पत्राशेड, दर्शन रांग परिसरातील स्वच्छतेसाठी सांगोल्याचे तहसीलदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्यातील शासकीय, निमाशासकीय कर्मचारी सहभाग घेणार आहेत. मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यातील कर्मचार्‍यांना चंद्रभागा नदीपलीकडील 65 एकर परिसरातील स्वच्छतेचे काम दिलेले आहे. माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदशनाखालील माढा तालुक्यातील टीमला चंद्रभागा नदी, घाट, वाळवंटाची स्वच्छता करण्याची जबाबदारी दिलेली आहे. आज शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून पावणेदहा वाजेपर्यंत स्वच्छतेचे हे काम करून या कर्मचार्‍यांना पुन्हा आपापल्या शासकीय कार्यालयांत कर्तव्यावर हजर राहावे लागणार आहे. यात्रेपूर्वीही ‘महास्वच्छता’ अभियान राबवण्यात आले होते आणि आता यात्रा संपल्यानंतरही  ‘महास्वच्छता’ अभियान हाती घेण्यात आलेले आहे. लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात  येत असल्याने कौतुक होत आहे. 

स्वच्छ झालेल्या भागांत मोहीम; उपनगरी भागांकडे दुर्लक्ष
 

शहराच्या मुख्य भागातील सफाईचे काम नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी जवळपास पूर्ण केलेले आहे. वाळवंट,  महाद्वार, प्रदक्षिणा मार्गावरील सफाई  मंदिर समितीच्या वतीने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने पूर्ण केलेली आहे. मात्र, उपनगरी भागांतील अस्वच्छता अजूनही कायम असून या ‘महास्वच्छता’ अभियानात उपनगरी भागांकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. सध्या स्वच्छ  झालेल्या भागांत येऊन हे कर्मचारी फोटोपुरते अभियान राबवणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.