Thu, Feb 21, 2019 22:16होमपेज › Satara › सातारा : दुचाकीची पोलिस व्हॅनला धडक; एक ठार

सातारा : दुचाकीची पोलिस व्हॅनला धडक; एक ठार

Published On: Apr 13 2018 3:43PM | Last Updated: Apr 13 2018 3:43PMसातारा : प्रतिनिधी

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारालगत शेंद्रे गावच्या हद्दीत भरधाव दुचाकीस्‍वार सातारा पोलिस व्हॅनला पाठीमागून धडकला. गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीस्‍वार ठार झाला. विकी महेंद्र वाघमारे (वय २६, रा.भक्तवडी ता.कोरेगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात मृत युवकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी रात्री विकी वाघमारे हा टीव्हीएस एमएच ११ सीके ६९४२ या दुचाकीवर धनंजय जाधव याच्यासमवेत निघाला होता. विकी वाघमारे हा दुचाकी चालवत होता तर धनंजय पाठीमागे बसलेला होता. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दुचाकी शेंद्रे गावच्या हद्दीत आल्यानंतर त्यावेळी पुढे निघालेल्या एमएच ११ एबी ८२३६ या पोलिस व्हॅनला धडक बसली. ही धडक एवढ्या जोरात होती की दुचाकी पुन्हा उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात विकी व धनंजय दोघे गंभीर जखमी झाले.

पोलिस व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याने घटनास्थळाकडे परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. जखमी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतल्यानंतर यातील विकी वाघमारे हा मृत झाला असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले. तोपर्यंत दोघांच्या नातेवाईकांना अपघाताबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व्हॅन व दुचाकी धडकेत युवक ठार झाल्याने पोलिसांमध्येही खळबळ उडाली.

तालुका पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेवून पंचनामा केला. फौजदार एस.बी.जाधव यांनी मृत विकी वाघमारे याच्याविरुध्द विना परवाना वाहन चालवणे व स्‍वत:च्या मृत्यूस जबाबदार ठरून दुसर्‍याला जखमी केल्याप्रकरणी गुन्‍हा दाखल केला आहे. 
Tags : satara, satara news, police van accident