Tue, Mar 19, 2019 05:09होमपेज › Satara › सातार्‍यात वडिलांसमोर मुलाचा खून

सातार्‍यात वडिलांसमोर मुलाचा खून

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 2:01AMसातारा : प्रतिनिधी

शहरातील मंगळवार तळे येथे शनिवारी मध्यरात्री डोक्यात रॉड मारून युवकाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. वडिलांच्या डोळ्यांसमोरच ही घटना घडली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. याप्रकरणी संशयिताला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, कोर्टातील केस मागे घेण्याच्या कारणातून हा खून झाला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

संदीप रमेश भणगे (वय 35, रा. व्यंकटपुरा पेठ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी प्रसाद प्रकाश कुलकर्णी (रा. व्यंकटपुरा पेठ) याला अटक केली आहे. मृत संदीप याचे वडील रमेश विठ्ठल भणगे (रा. व्यंकटपुरा पेठ) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

संदीप भणगे हा त्याच्या आई-वडिलांसोबत राहत होता. सध्या तो बेरोजगार होता. शनिवारी सकाळी  घराबाहेर पडलेला संदीप रात्री 11 वाजेपर्यंत घरी आला नव्हता. त्यामुळे रमेश भणगे संदीपला पाहण्यासाठी पायी चालत राजवाड्याकडे आले. राजवाडा परिसरातही संदीप न दिसल्याने ते पुन्हा पायी मंगळवार तळ्यावरुन निघाले होते. त्याचवेळी त्यांना त्यांचा मुलगा संदीप व संशयित आरोपी प्रसाद कुलकर्णी हे दोघे दिसले. यावेळी प्रसाद जोरजोरात ओरडत होता. ‘तू सातारा शहर पोलिस ठाण्यातील केस मागे का घेत नाहीस, तुला आता जिवंत ठेवत नाही, असे म्हणत संशयित प्रसाद कुलकर्णी याने लोखंडी पाईपने संदीपच्या डोक्यात मारहाण केली. संदीपला मारत असताना त्याचे वडील पाहत असल्याचे प्रसादच्या लक्षात आल्यानंतर तो तेथून पळून गेला. यावेळी घटनास्थळी आणखी दोघे- तिघे असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान मारहाणीच्या या घटनेने संदीप घटनास्थळी रक्तबंबाळ अवस्थेत पडला. या घटनेने संदीपचे वडील घाबरुन गेले. भणगे दाम्पत्याने मुलगा संदीप याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय सुत्रांनी संदीप भणगे याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. तोपर्यंत शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. पोलिसांनी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर लगेचच संशयित आरोपी प्रसाद कुलकर्णी याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशी केल्यानंतर प्रसाद याने खुनाची कबुली दिली. रविवारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली.

मंगळवार तळे परिसरात सलग दुसर्‍या वर्षी खून..
गतवर्षी मंगळवार तळे येथेच युवकाचा निर्घृण खून झाला होता. यावर्षीही त्याची पुनरावृत्ती झाल्याने परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. दोन्ही घटनांत रक्ताचा अक्षरश: सडा पडलेला होता. वारंवार घडणार्‍या अशा घटनांमुळे महिला, युवती व वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात रात्री व दिवसाही पोलिस गस्त वाढवावी, तसेच सीसीटीव्ही कार्यान्वित करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Tags : satara, young boy, murder, crime