Mon, May 27, 2019 08:55होमपेज › Satara › कराड येथे युवकाचा गळा चिरून खून

कराड येथे युवकाचा गळा चिरून खून

Published On: May 30 2018 9:36PM | Last Updated: May 30 2018 9:36PMकराड(जि. सातारा) : प्रतिनिधी

कराडपासून जवळ ओगलेवाडी-टेंभू रस्त्यालगत युवकाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली. गेल्‍या २४ तासांपूर्वी ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, युवकाची ओळख पटली नाही. दरम्यान, खून झालेला युवक कराडमधील असल्याची चर्चा असून, त्याचा खून कोणी? व का? केला याचा तपास पोलिस करत आहेत. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ओगलेवाडी ते टेंभू जाणाऱ्या रस्त्यालगत स्टेशन फाट्यापासून जवळच फाटकांचे शेत नावच्या शिवारात युवक पडल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या लक्षात आले. याबाबत बुधवारी ओगलेवाडी परिसरात चर्चा सुरु झाल्यानंतर पोलिस पाटील मुकूंदराव कदम यांनी खात्री केली असता सुमारे 30 ते 32 वर्षे वय असलेल्या युवकाचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेह रस्त्यापासून सुमारे 12 ते 15 फूट आत शेतात टाकण्यात आल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी त्वरीत याबाबतची खबर पोलिसांना दिली. खून झाल्याची माहिती मिळताच डीवायएसपी नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलिस निरीक्षक राजमाने, सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी खून झालेल्या युवकाचा धारदार शस्त्राने गळा चिरून व पोटावर वार करून खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी शोधाशोध केली असता काहीही सापडले नाही. अंधार पडल्याने शोध घेण्यात अडचण येत असल्याने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेन करण्यासाठी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आणला होता.    

दरम्यान, खून झालेला युवक कराडमधील असल्याची चर्चा शहरात सुरु होती. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. तरीही खून झालेला युवक कोण होता? त्याचा खून कोणी? व का? केला याची माहिती मिळू शकली नाही. दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी हा खून केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.