होमपेज › Satara › काळ आला होता पण, वेळ आली नव्हती

काळ आला होता पण, वेळ आली नव्हती

Published On: May 10 2018 2:02AM | Last Updated: May 10 2018 12:49AMलोणंद : प्रतिनिधी

अंदोरी येथील बुवा साहेब मंदीर (दगडे वस्ती ) जवळून  जाणार्‍या वीर धरणाच्या निरा उजवा कालव्यात मंगळवारी दुपारी कपडे  धुण्यासाठी गेलेल्या सासू, सुन व नात या तिघीही कालव्यातील पाण्यात पडल्या. यावेळी कालव्यालगत असणार्‍या रस्त्यावरून जात असताना पाडळी येथील युवक कैलास जाधव याने ही घटना पाहिली. त्यानंतर त्याने अन्य वाटसरूंच्या मदतीने या तिघींचा जीव वाचवले. यानंतर त्यांना लोणंद येथील खासगी रूग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. त्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती त्या तिघींना आली.

लोणंद शिरवळ रस्त्यापासून 8 किमी अंतरावर अंदोरी गावाच्या पूर्वेस बुवासाहेब मंदिर मार्गे पिंपरे, बु. बावकलवाडीकडे जाणारा रस्ता आहे. या ठिकाणाहून वीर धरणाचा कालवा आहे.  दगडे वस्तीकडे जाण्यासाठी कालव्यावर पुल आहे . या पुलाच्या पश्‍चिम बाजूला कपडे धुण्यासाठी कालव्यावर  घाट केला आहे. या घाटावर धायगुडे मळा येथील सौ. नंदा प्रल्हाद धायगुडे, त्यांची सुन सौ. वर्षा बाळकृष्ण धायगुडे  व नात रिद्धी बाळकृष्ण धायगुडे  या तिघी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी नंदा धायगुडे यांची नात रिध्दी हिला पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे तिने पाण्यात उडी मारली. मात्र, तिला पोहता येत नसल्याने ती बुडून वाहू जाऊ लागतात. तिची आई व आजीने पाण्यात उड्या मारून तिला पकडले. पण पाण्याच्या प्रवाहात या तिघीही वाहू लागल्या. सुमारे 100 फुट अंतरावर गेल्यानंतर दगडे वस्तीकडे जाणार्‍या पुलाच्या पिलरला त्यांनी धरून आरडा ओरडा केला. त्याचवेळी दगडी वस्तीकडे जात असलेला कैलास जाधव याने त्यांना पाहिले. त्यांनतर त्याने नागाई देवीकडे जाणार्‍या भाविकांच्या मदतीने तिघींनाही पाण्यातून बाहेर काढले. यामध्ये तिघींच्याही नाका तोंडात पाणी गेल्यामुळे त्यांना लोणंद येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  या तिघींचा जीव वाचविणार्‍या कैलास जाधव व अन्य वाटसरूंचे  नातेवाईक व ग्रामस्थांनी आभार मानले.  

तिघींचा प्राण वाचवला हेच समाधान : जाधव
अंदोरीच्या दगडे वस्ती कडे जाताना कॅनॉलच्या पाण्यात पुलाच्या पिलरला धरून तिघी आरडा ओरडा करत होत्या. पाण्यात उडी मारून वाचवण्यास गेल्यास त्यांनी पिलरची पकड सैल होऊन वाहून जाण्याची भीती होती. त्यामुळे कैलास व अन्य वाटसरूंनी साडीचा वापर करत त्याचा दोरसारखा वापर केला. त्यानंतर त्या तिघींनाही हळूहळू धीर देत त्यांना पाण्याच्या बाहेर काढले. आम्हाला याचे समाधान लाभले की तिघींचा प्राण वाचविण्यात आम्हाला यश आले. अशी प्रतिक्रिया कैलासने  दै.‘पुढारी’शी बोलताना दिली.
 

Tags :  satara, lonand, drowning, women