Tue, Jul 16, 2019 22:21होमपेज › Satara › येरळेच्या नदीपात्राला नेरच्या पाण्याचा ओलावा 

येरळेच्या नदीपात्राला नेरच्या पाण्याचा ओलावा 

Published On: Feb 08 2018 1:54AM | Last Updated: Feb 07 2018 11:00PMखटाव : प्रतिनिधी

कायम  दुष्काळी असणार्‍या खटाव तालुक्यातील येरळा नदीचे कोरडे पात्र यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यातही  पाण्याने भरले आहे. नेर धरणातून सोडलेल्या पाण्याने ही किमया केली आहे. खटाव, पुसेगाव आणि कुरोली परिसरातील नदीवरिल बंधारे तुडुंब भरल्याने पिण्याच्या पाण्याच्या नळपाणीपुरवठा योजना आणि नदीकाठच्या शेतकर्‍यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

      गेल्या वर्षी       खटाव तालुक्याच्या उत्तर भागात बर्‍यापैकी पाऊस झाल्याने ब्रिटीशकालीन नेर धरणात चांगलाच पाणीसाठा झाला होता. उपलब्ध पाणीसाठा शेतकर्‍यांच्या रब्बी हंगामासाठी सोडण्याचे नियोजन करण्यासाठी खटावमध्ये पाणीवाटप आणि कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली होती. लाभक्षेत्रातील  शेतकर्‍यांना पाणीमागणी अर्ज आणि पाणीपट्टी भरण्याचे अवाहन करण्यात आले होते. पाटबंधारे विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे नेर डावा, उजवा आणि मुख्य कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले. सेवागिरी यात्रेदरम्यान येरळा नदीपात्रातही पाणी सोडण्यात आले होते. नेर धरणाच्या लाभक्षेत्रातील कुरोली, भुरकवडी या गावांपर्यंत पाणी पोहचण्यात येणार्‍या अडचणी ध्यानात घेऊन यावर्षी खटावसह त्या भागातील  शेतकर्‍यांनी एकत्र येवून धरणातील पाणी नदीपात्रातून सोडण्याची मागणी केली. जि. प. सदस्य प्रदीप विधाते, माजी पं. स. सदस्य डॉ. विवेक देशमुख यांनी पुढाकार घेऊन पाणीपट्टी भरण्यासह अधिकारी आणि  शेतकर्‍यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली. आ. शशिकांत शिंदे यांनीही त्या बैठकीत आग्रही भूमिका घेत नेरचे पाणी येरळा नदीपात्रात सोडण्यासाठी प्रयत्न केले. दहा दिवसांसाठी पाणी सोडण्यात आल्याने पुसेगाव, काटकरवाडी, नांगरे गोठा,खटाव, शिरसवस्ती, कुरोली या भागातील येरळा नदीवरील सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. नदीपात्रात ऐन जानेवारीच्या उत्तरार्धात पाणी आल्याने लघुनळपाणीपुरवठा योजना तसेच शेतकर्‍यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. नदीकाठच्या विहिरींची पाणीपातळीही वाढली आहे.  नदीपात्रातून पाणी सोडण्यावरुन शेवटी शेवटी मतभेद निर्माण झाले होते मात्र आ. जयकुमार गोरे, आ. शशिकांत शिंदे यांनी लक्ष घालून रब्बी हंगामासाठी पुरेसे पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केले.

पाटबंधारे विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी नेर धरणातील पाणी सुरुवातीला एक महिना कॅनॉलद्वारे आणि नंतर दहा दिवस नदीपात्रातून सोडण्यासाठी चांगले नियोजन केले. धरणातील पाणी अधिकाधिक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यात पाटबंधारे विभागाला यश आले. खटावच्या जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे कौतुक करण्यात आले.