Fri, Jun 05, 2020 11:02होमपेज › Satara › यशवंतरावांचा करिष्मा; काँग्रेसची मुसंडी

यशवंतरावांचा करिष्मा; काँग्रेसची मुसंडी

Published On: Sep 27 2019 2:18AM | Last Updated: Sep 27 2019 12:09AM
सातारा : प्रतिनिधी

सत्तांतराचा तराजू जिल्ह्यात पूर्वीही हेलकावे खात होता. 1952 सालच्या निवडणुकांमध्ये पानिपत झालेल्या काँग्रेसने 1962 सालच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व सत्‍ताकेंद्रे काबीज करत जोरदार मुसंडी मारली होती. जिल्ह्याच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण यांचा करिष्मा दिसू लागला.  त्यानंतरच जिल्ह्यात विकासाचे राजकारण सुरु झाले. फलटणमध्ये राजेगटाच्या विरोधकांमध्ये फूट पडल्याने मालोजीराजे प्रचंड मतांनी विजयी झाले. कराड दक्षिणचा भाग उत्‍तरेला जोडण्याचे राजकारण झाले.  

त्रिभाषिक राज्याच्या दुसर्‍याच निवडणुकीत संयुक्‍त महाराष्ट्राच्या चळवळीचा वणवा पेटून सातारा जिल्ह्यातील काँग्रेस होरपळली. कराड उत्‍तर व पाटणचा अपवाद वगळता समितीला सर्वत्र यश मिळाले होते. 1962ला महाराष्ट्राच्या  पहिल्या निवडणुकीसाठी मात्र काँग्रेस नेटाने कामाला लागली. महाराष्ट्राचा मंगलकलश आणण्याचे श्रेय घेत यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेसला पुन्हा बळ मिळवून दिले. याच काळात महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे सातारा जिल्ह्यातून हलू लागली होती. सातारा कामगार पक्ष व समाजवाद्यांना काँग्रेसमध्ये घेण्याची धडक मोहीमच राबवली जावू लागली. महाराष्ट्राच्या या पहिल्या निवडणुकीत पुढील 30 वर्षांची बीजे रोवली गेली. 

1957 साली मुंबईच्या त्रिभाषिक प्रांताची आणि त्यानंतर 1962 साली  महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. मुंबई प्रांताची पहिली पाच वर्षे पार पडल्यानंतर संयुक्‍त महाराष्ट्राची चळवळ रंगात आली.  तिचाच परिणाम  होवून माण, खटाव, फलटण, वाई, जावली, सातारा, कराड दक्षिण या सात मतदारसंघात काँग्रेस चारीमुंड्या चीत झाली अन् समितीने विजयाचे निशाण ठिकठिकाणी उभे केले.  कराड उत्‍तरमधून यशवंतराव चव्हाण तर पाटणमधून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा अपवाद वगळता काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. त्यानंतर समितीमुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी डावी आघाडी एकसंघपणे उभी राहिली. संयुक्‍त महाराष्ट्र चळवळ बलशाली झाल्यामुळे 1957 च्या निवडणुकीत काँग्रेसला अनेक मतदारसंघात उमेदवार मिळणे अवघड झाले होते. पुढे काँग्रेसला या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या पार्श्‍वभूमीवर यशवंतराव चव्हाण यांनी या निवडणुकीनंतर पुन्हा काँग्रेस चार्ज केली आणि त्यांनी शेतकरी कामगार पक्ष मोडीत काढण्याचा जणू विडाच उचलला. त्यामुळे 1957 च्या निवडणुकीत पराभूत झालेल्या काँग्रेसने  1962च्या महाराष्ट्र विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत पुन्हा घवघवीत यश मिळवले. 

कराड दक्षिणमधून काँग्रेसने उमेदवार बदलल्याने  वडगावच्या दादासाहेब जगतापांना उमेदवारी मिळाली. मात्र, या काळात शेकापचा मोठा झंझावात निर्माण झाल्यामुळे यशवंतराव मोहितेंचा विजय झाला. याचवेळी 1952 ला पराभूत झालेल्या संभाजीराव थोरातांना विधान परिषदेवर संधी मिळाली. दक्षिणेत शेकापच्या यशवंतराव मोहितेंनी तर उत्‍तरेत काँग्रेसच्या यशवंतराव चव्हाणांनी घवघवीत यश मिळवले. कार्वे, वडगाव, कोरेगाव ही गावे दक्षिणेतून उत्‍तरेला जोडण्याची मोठी खेळी करण्यात आली. केशवरावांचे कार्यकर्ते असलेल्या गीजरेबापूंचा खून झाला. त्यामुळे यशवंतराव हजाराच्या फरकाने निवडून आले. 
पाटणमध्ये लोकनेत्यांचा दबदबा वाढत असतानाच तेथे शेकापने बाळासाहेब गणपतराव पाटणकर यांना उमेदवारी दिली. बाळासाहेबांनी तोपर्यंत तालुक्यात निर्माण केलेल्या प्रचार यंत्रणेमुळे त्यांचा पुन्हा विजय झाला. 1962 लाही अशीच लढत झाली आणि निकालही त्याप्रमाणेच आले.

कष्टकरी समाजाचे नेते अशी  ओळख असलेल्या व्ही. एन. पाटील यांनी पुन्हा  संयुक्‍त महाराष्ट्र समितीच्या पाठिंब्यावर आपली चळवळ निर्माण केली. त्यांची लढत ईस्माईल नूर महंमद हकीम व रसूल बागवान यांच्याशी झाली. अपेक्षेप्रमाणे व्ही. एन. पाटील प्रचंड मतांनी निवडून आले. त्यानंतर मात्र पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला. 1962 साली व्ही. एन. पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले.  तर  काँग्रेसने त्यांच्याविरोधात धोंडिराम सिदोजी जगतापांना तिकीट देवून निवडून आणले होते. 

1952 साली झालेल्या पहिल्या निवडणुकीनंतर संयुक्‍त महाराष्ट्राबाबत अहवाल आला आणि या चळवळीला उधाण आले. समितीची स्थापना होवून शेकाप, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी, लाल निशाण आदिंचे संगठण झाले. संयुक्‍त महाराष्ट्राच्या विचारधारेतील विद्यमान आमदारांनी बेधडकपणे राजीनामे देवून पोटनिवडणुकीला सामोरे जाणे पसंत केले. समितीचा प्रचंड प्रभाव असल्याने या उमेदवारांच्या विरोधात एकही जण उभा राहिला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली होती. 

नाईक निंबाळकर घराण्याचे  फलटणमध्ये वर्चस्व असतानाही हरिभाऊ निंबाळकरांची चळवळ आकाराला येत होती. या चळवळीत हिंदुराव ना. निंबाळकर यांच्या मातोश्रींचासुध्दा सक्रिय सहभाग होता. कष्टकरी व साखर कामगारांच्या चळवळीनेही याच काळात बाळसे धरले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून तिकीट मिळवलेल्या हरिभाऊंनी 1957 ला मालोजीराजेंचा पराभव केला. 1962च्या निवडणुकीवेळी राजे गट विरोधकांमध्ये फूट पडली आणि काँग्रेसने सीपीआयचा बदला घेतला.  मालोजीराजेंना 33 हजार 741 मते मिळाली तर हरिभाऊंना केवळ 9 हजार 209 मते मिळाली. यावेळी हरिभाऊंचा पराभव झाला होता. 

कोरेगावात 1962 ची निवडणूक चांगलीच गाजली होती. समाजवादी असलेल्या तुषार पांडूरंग पवार यांना यशवंतराव चव्हाणांनी काँग्रेसमध्ये आणले. कूपरमधील कामगारांचे संघटन आणि यशवंतराव चव्हाणांचा करिष्मा यामुळे काँग्रेसचे तिकीट मिळवलेल्या पवारांच्याविरोधात उमेदवारच मिळाला नाही. पवारांनी विठ्ठल पांडुरंग भोसले या अपक्ष उमेदवाराचा सहज पराभव केला. पवारांना 20 हजार 609 तर भोसले यांना 8 हजार 107 मते मिळाली.

संयुक्‍त महाराष्ट्राचा वनवा पेटल्यानंतर सातारा जिल्ह्यात प्रचंड नाराजीचे वातावरण होते. परिणामी त्यातून यशवंतराव चव्हाण हेदेखील सुटू शकले नाहीत. पुसेगावात त्यांच्या विरोधात  मोर्चा निघाला होता. समाजवादी पक्षाकडून केशवराव पाटलांना तिकीट देत  संयुक्‍त महाराष्ट्र समितीने त्यांच्यामागे मोठी ताकद निर्माण केली तर यशवंतरावांनी परशुराम घार्गें यांच्या पत्नींना काँग्रेसचे तिकीट दिले. यामध्ये केशवराव पाटील मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. 1962 च्या निवडणुकीत याच मतदारसंघातून काँग्रेसने  शिवाजीराव पवार यांना  उमेदवारी दिली. पवारांनी खटाव मतदारसंघ  पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात आणून दिला आणि तो पुढे अनेक वर्षे काँग्रेसच्याच ताब्यात राहिला. 

माण स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला असला तरी तो  राखीव ठेवण्यात आला होता. इथे रिपाइं विरुध्द काँग्रेस अशीच लढत होत राहिली. लक्ष्मण बाबाजी भिंगारदेवे यांनी 1962 साली माजी आमदार खंडेराव सखाराम सावंत यांना पराभूत केले. जावली  मतदारसंघात बाबासाहेब आखाडकरांच्या विजयानंतर  राजकीय घडामोडी घडल्या. त्याचवेळी  महात्मा गांधी यांच्यावरील नथुराम गोडसेचा पहिला हल्ला रोखलेल्या भिकू दाजी तथा भि. दा. भिलारे गुरुजींच्या राजकारणाला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. स्वातंत्र्यसैनिक असलेले भिलारे गुरुजी हे गांधीजींच्या पथकातील प्रमुख स्वयंसेवक होते. काँग्रेसच्या तिकीटावरुन त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या गणपतराव शिवराम भिलारे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. 1957 च्या निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला होता. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे पानिपत झाले असले तरी 1962 ला काँग्रेसला जिल्ह्यातील सर्व सत्‍ता केंद्रे हस्तागत करण्यात यश मिळाले होते.  यशवंतराव चव्हाण यांचा करिष्मा याच काळात रंगात आला होता. त्यानंतरच जिल्ह्यात विकासाचे राजकारण सुरु झाले. 

जिल्ह्यात नात्यागोत्याचे राजकारण नवखे नाही. यशवंतराव चव्हाण यांचे भाचे धोंडिराम सिधोजी जगताप यांना सातार्‍यातून तिकीट देऊन यशवंतरावांनी त्यांना विजयी केले. त्यानंतर 1967 च्या निवडणुकीतही बेरजेचे राजकारण करुन पुन्हा यशवंतरावांनी त्यांनाच तिकीट दिले. मात्र, सातार्‍यात छत्रपती शिवरायांच्या वंशजांचे राजघराणे असले तरी त्यांचा मानमरातब राखत या घराण्याला सक्रिय राजकारणापासून लांबच ठेवण्यात आले होते. देशभरातील राजघराणी सक्रिय राजकारणात होती. मात्र, त्यावेळी सातार्‍यात भोसले यांच्याऐवजी जगतापांचा विजय होत होता. 

आज ज्या जिल्ह्यात भाजपचे कमळ उगवले आहे  त्याच जिल्ह्याचा इतिहास काय होता? हे नव्या पिढीला समजले पाहिजे. यशवंतरावांनी जिथे काँग्रेस वाढवली तिथेच आज भाजपचे कमळ फुलले आहे. 
        (क्रमश:)