Fri, Jun 05, 2020 11:50होमपेज › Satara › साताऱ्यात शिवसैनिकांनी आठही मतदारसंघात कामाला लागावे

उमेदवार कोण हे मातोश्रीवरून ठरेल

Published On: Sep 27 2019 2:18AM | Last Updated: Sep 27 2019 2:18AM

मेळाव्यात मार्गदर्शन करताना ना. दिवाकर रावते व्यासपीठावर ना.नितीन बानुगडे पाटील, आ. सदाशिव सपकाळ, पुरूषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव व इतर.सातारा : प्रतिनिधी

राज्यात भाजपाची युती होवो अथवा न होवो मात्र शिवसेनेचे सामर्थ्य दाखवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे. उमेदवार कोण हे मातोश्रीवरून ठरेल. समोरच्याला धडकी भरली पाहिजे, असे काम शिवसैनिकांनी मतदारसंघात करावे, असा इशारा शिवसेनेचे संपर्क नेते व परिवहनमंत्री ना.दिवाकर रावते यांनी दिला.

सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांचा पदाधिकार्‍यांचा मेळावा नरिमन हॉल येथे संपन्न झाला. या मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ना. प्रा. नितीन बानुगडे पाटील, माजी. आ. सदाशिव सपकाळ, पुरूषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, जयवंत शेलार, विश्वनाथ धनावडे, यशवंत घाडगे, रणजित भोसले, हणमंत चवरे उपस्थित होते.

ना. रावते पुढे म्हणाले, निवडणूक हा महत्वाचा विषय आहे. आपल्याला लढाईला सामोरे जायचे असेल तर आपलीही तितकीच तयारी पाहिजे. ही पहिली निवडणूक अशी आहे की तिला कमी दिवसाचा कालावधी आहे. वरिष्ठ पातळीवर महायुतीबाबत बोलणी सुरू आहे. परंतू गाफील न राहता युती झाली तर युतीच्या उमेदवारांसाठी नाही झाली तर शिवसेनेच्या उमेदवारासाठी एकजुटीने कामाला लागणे गरजेचे आहे. सरकारने केलेली कामे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी घरोघरी जावे. उमेदवार कोण हे सांगू शकत नाही. मात्र मातोश्रीवरून उमेदवार ठरणार आहे. ही निवडणूक उमेदवाराची नसून पक्षाची व धनुष्यबाणाची आहे. शिवसैनिकांनी समोरच्या माणसाला धडकी भरेल असे काम केले पाहिजे. वाई, माण व खटाव, कराड उत्तर, दक्षिण मध्ये गेल्या दोन महिन्यांपासून फिरत असून सर्वच पदाधिकारी व शिवसैनिक कामाला लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील घराघरात आपल्या पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी गेले पाहिजे पक्षाची ध्येयधोरणे सांगितली पाहिजेत. भाजपाची युती होवो अथवा न होवो मात्र शिवसेनेचे सामर्थ्य दाखवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी लढायची तयारी केली पाहिजे. 

प्रत्येक मतदारसंघातील गावागावात 8 शिवसैनिक जावून लोकांमध्ये चर्चा करतील शिवसेनाप्रमुख म्हणून प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे.या बैठकीनंतर सर्वच मतदारसंघात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  वातावरण निर्मिती करत कामाला लागण्याच्या सुचनाही दिवाकर  रावते यांनी केल्या. महाराष्ट्रात कोपरा न कोपर्‍यात कोण काय करणार आहे याचा सर्व्हे झाला आहे. मात्र जे पक्षात राहून चुकीचे काम करत आहेत त्यांनी सरळ राजीनामे द्यावेत त्यांना दरवाजा उघडा आहे.  यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, उपजिल्हा प्रमुख,  क्षेत्रप्रमुख, संघटक, तालुकाप्रमुख, युवा सेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी व  शिवसैनिक उपस्थित होते.

पदाधिकारी व शिवसैनिकांची कानउघाडणी

दिवाकर रावते हे मेळाव्याच्या ठिकाणी हजर झाल्यानंतर त्यांनी महिलांना मागे का बसविले आहे ? पुढे घ्या, असे सांगत एका कार्यकर्त्याला हाताची घडी सोड ना तुला थंडी वाजते का? काय जिल्हाप्रमुख हे काय नियोजन? निवडणुका लढवायला उभे राहता का? अशा शब्दात प्रत्येकांची कानउघाडणी केली. तसेच कराड उत्तरमधील कार्यकर्त्यांला अस्तित्व दाखवायला तुमच्यामध्ये सामर्थ्य नाही तुम्ही कसल्या निवडणुका लढवणार? संपर्क प्रमुख आलेत का? उभे रहा, अशा शब्दात कार्यकर्त्यांना सुनावले. तर मेळाव्यासाठी उशिरा येणार्‍या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चांगलेच फैलावर घेतले. शिवसेना म्हणजे शिस्त, ती सैनिकांनी अंगी बाळगलीच पाहिजे, असे सांगत उशिरा येणार्‍यांना  मागे बसवा. निवडणुकीच्या धामधुमीत तरी पदाधिकारी या नात्याने मेळाव्यांना वेळेवर या, अशा कानपिचक्याही त्यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांना दिल्या.