Wed, Apr 24, 2019 07:38होमपेज › Satara › लोणंद नगरपंचायत कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

नगरसेविकेच्या पतीकडून शिवीगाळ

Published On: Dec 14 2017 1:46AM | Last Updated: Dec 13 2017 11:06PM

बुकमार्क करा

लोणंद : प्रतिनिधी

लोणंद नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यास बांधकाम सभापती  दीपाली क्षीरसागर यांच्या पतीने शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ हमाल पंचायत व जनरल कामगार संघटनेच्या नगरपंचायत कर्मचार्‍यांच्या वतीने बुधवारी सकाळी काम बंद आंदोलन केले. यानंतर दिपाली क्षीरसागर यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने अडीच  तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

लोणंद येथील सईबाई सोसायटी कमान ते आयटीआय रोडचे कामाच्या भूमिपूजनप्रसंगी नगराध्यक्षा यांनी दुरध्वनीने तोंडी आदेशावरून या कामाबाबत माहिती देण्यासाठी नगरपंचायतीचे कर्मचारी बाळकृष्ण भिसे व अन्य कर्मचार्‍यांना बोलावले होते. त्यावेळेस प्रभाग क्र. 17 च्या  नगरसेविका व बांधकाम सभापती  दीपाली क्षीरसागर यांचे पती रवींद्र क्षीरसागर यांनी याठिकाणी जावून बाळकृष्ण भिसे यांना शिवीगाळ केली होती.

या प्रकारांमुळे नगरपंचायतच्या सर्व कर्मचार्‍यांच्यात तीन ते चार दिवसांपासून असुरक्षिता निर्माण होऊन भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे बुधवारी नगरपंचायत कर्मचारी, हमाल पंचायत व जनरल कामगार संघटना यांनी एकदिवसीय काम बंद आंदोलन पुकारले. सकाळी दहाच्या सुमारास नगरपंचायत इमारतीच्या पोर्चमध्ये कर्मचारी ठिय्या मारून बसले.

आंदोलनाला लोणंद शहर शिवसेना, जीवनआनंद खोकीधारक संघटना, रिपाइं यांनी पाठींबा दिला होता. दुपारी साडेबाराला दिपाली क्षीरसागर यांनी कर्मचार्‍यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केल्यानंतर कर्मचार्‍यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनस्थळी नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळेके, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी,  विरोधी पक्षनेते राजेंद्र डोईफोडे, महिला बालकल्याण सभापती हेमलता कर्णवर, नगरसेवक शैलजा खरात, सचिन शेळके, हणमंत शेळके, योगेश क्षीरसागर उपस्थित होते.