Tue, Jul 23, 2019 11:48होमपेज › Satara › महिलेने झिंज्या धरून युवतीला बदडले

महिलेने झिंज्या धरून युवतीला बदडले

Published On: Mar 14 2018 12:49AM | Last Updated: Mar 14 2018 12:18AMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील गजबजलेल्या  पोवईनाक्यावर मंगळवारी भर दुपारी एका महिलेने महाविद्यालयीन युवतीच्या झिंज्या धरून तिला रस्त्यावरच बदडले. या घटनेने बघ्यांची गर्दी उसळली. त्यामुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित महिला व युवतीला पोलिस ठाण्यात आणले. दरम्यान, पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून  या युवतीला मारहाण झाल्याचे समोर आले आहे. 

सोमवारी  दुपारी  3 वाजण्याच्या सुमारास सातारा तहसील कार्यालयासमोर रस्त्यावर एक महिला युवतीला जाब विचारत तावातावाने  भांडत होती. पाहता पाहता दोघीमधील वाद विकोपाला गेला व त्यातच महिलेने रौद्ररुप धारण करुन युवतीला बडवण्यास सुरुवात केली. युवतीसोबत असलेल्या मैत्रीणीही या घटनेने बिथरल्या. आपल्या मैत्रिणीला अचानक मारहाण होवू लागल्याने  त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.  मात्र, त्या महिलेने मध्ये पडलेल्या  तिच्या मैत्रिणींचीही धुलाई करण्यास सुरूवात केली. या घटनेने बघ्यांची गर्दी उसळली. वाहतूकही विस्कळीत झाली.  मारहाण झाल्याने युवती पळून जावू लागली.  महिलेनेही तिचा पाठलाग सुरू केला.  या सर्व प्रकारामुळे उपस्थित बुचकळ्यात पडले. या भांडणाची माहिती वाहतूक विभागाच्या पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. दोघे वाहतूक पोलिस पुरुष असल्यामुळे त्यांचीही मोठी पंचाईत झाली होती. 

महिला तडातडा मारहाण करण्याची प्रयत्न करत होती तर युवतीचे हाल-हाल होत होते.  पोलिसांचे दोघींना शांत करण्याचे प्रयत्न अपुरे पडत होते. अखेर घटनेचे व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून वाहतुक पोलिसांनी वडापची एक जीप मागवली. संबंधित महिला व युवतीला जीपमध्ये घातले व त्यांची  वरात सातारा शहर पोलिस ठाण्यात आणली. पोलिस ठाण्यामध्ये जत्रा आल्यानंतर तणावसद‍ृश: वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी महिला व युवतीला आतमध्ये नेल्यानंतर पोलिस ठाण्याबाहेर जमा झालेल्या इतर युवतींना तेथून हाकलून देण्यात आले. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.