Fri, Mar 22, 2019 05:55
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › गुन्हेगारीवर वचक ठेवणार : एसपी पंकज देशमुख 

गुन्हेगारीवर वचक ठेवणार : एसपी पंकज देशमुख 

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 29 2018 11:44PMसातारा : प्रतिनिधी

नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे दोन दिवसांमध्ये सातारचा कार्यभार स्वीकारणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारींवर वचक ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना व्यक्‍त केला. नवीन संकल्पना राबवण्यावर भर देणार असून गुन्हेगारांचा बिमोड करून पोलिस ठाण्यामध्ये तक्रार घेऊन येणार्‍यांना न्याय देण्याची भावना रुजवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे सध्या उस्मानाबाद येथे कार्यरत असून त्यांची सातारा पोलिस अधीक्षकपदी नियुक्‍ती झाली आहे. सातारचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी रविवारी दुपारी पुणे ग्रामीणचा कार्यभार स्वीकारल्याने सातारचा कार्यभार सध्या अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्याकडे आहे.

नुतन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी दै.‘पुढारी’ने संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्या मराठवाडा विभागात मराठा मोर्चाचे आंदोलन सुरु आहे. शासनाचेही आपणाला आदेश प्राप्‍त झाले नसून उस्मानाबादची परिस्थिती हाताळल्यानंतर आपण सातारला रुजू होणार आहे. यामुळे सातारला रुजू होण्यास थोडा विलंब होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातील आंदोलनाची परिस्थितीही त्यांनी  ‘पुढारी’कडून आवर्जुन जाणून घेतली. तालुकानिहाय आंदोलन सुरु असल्याचे सांगताच त्यांनी तालुक्यांबाबत माहिती घेतली.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळत असल्याने त्याचा विशेष आनंद आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्याची जशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली आहे तशीच ती आपल्या कालावधीतही अबाधित व चोख ठेवून नवनवीन संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांच्या साथीने सातारा पोलिस दलाचा नावलौकीक ठेवण्याचाच आपला प्रयत्न राहणार आहे.

यंग पोलिस अधिकार्‍यांची हॅटट्रिक....

एसपी पंकज देशमुख हे मूळचे हिंगणघाट, जि.वर्धा येथील आहेत. बी.ई. सॉफ्टवेअर त्यांचे शिक्षण झाले असून पुणे येथील एका कंपनीमध्येही त्यांनी नोकरी केली होती. याचदरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करत असताना ते 2011 साली उत्तीर्ण झाले व आयपीएस केडर मिळाले. त्यांची यंग व डायनॅमिक ऑफिसर म्हणून ओळख आहे. सातारा जिल्ह्याला डॉ.अभिनव देशमुख, संदीप पाटील व आता एसपी म्हणून पंकज हेही तरुण पोलिस अधीक्षक म्हणून लाभल्याने जिल्ह्यात ‘यंग पोलिस अधिकार्‍यांची हॅटट्रिक’ यानिमित्ताने होत आहे.