Tue, Apr 23, 2019 07:34होमपेज › Satara › सातार्‍यात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निघृण खून 

सातार्‍यात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निघृण खून 

Published On: Jan 27 2018 8:02PM | Last Updated: Jan 27 2018 8:29PMसातारा : प्रतिनिधी 

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या गळ्यावर सत्तुराने वार करून निघृण खून केल्याची घटना सातार्‍यातील गडकरआळी परिसरात घडली. श्रध्दा भारत जाधव (24) रा.68 गुरूकुल, शिवाजीनगर, गडकर आळी, शाहुपुरी सातारा असे मृत पत्नीचे नाव असून घटनेनंतर पती भारत कमलाकर जाधव (29) याच्या शोधासाठी पोलीसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापगंज पेठ येथे राहणार्‍या श्रध्दा व भारत यांचा सूमारे चार ते पाच वर्षांपुर्वी प्रेमविवाह झाला होता. परंतु त्यांना अद्याप अपत्य नव्हते. सुरूवातीच्या काळात दोघांचा संसार चांगल्यापध्दतीने सुरू होता मात्र मागील काही काळापासून दोघांमध्ये खटके उडत होते. अशातच भारत हा व्यसनाच्या आहारी गेला होता. अशातच भारत पत्नी श्रध्दा हिच्या चारित्र्यावर संशय ही घेवू लागला. दरम्यानच्या कालावधीत त्यांनी गडकरआळी येथे भाड्याने घर घेवून राहू लागले होते. मात्र, तरी ही सतत होत असलेल्या वादामुळे श्रध्दा ही मागील काही दिवसांपासून  परगावी रहात होती. मात्र, शनिवारी ती त्यांनी भाड्याने घर घेतलेल्या ठीकाणी आल्याची माहिती पती भारतला मिळाली. 

ज्यावेळी ही माहिती मिळाली तेव्हा भारत मोठ्या प्रमाणात दारू पिला होता. दारूच्या नशेतच तो शनिवारी दुपारी घरी पोहचला आणि हाथात असलेल्या सत्तुराने श्रध्दाच्या मानेवर सपासप वार केले. वार एवढे भयानक होते की, वाचवा वाचवा असे म्हणत बाहेर येईपर्यंतच श्रध्दा दारात कोसळली आणि अखेर जाग्यावरच तिचा अक्षरशः तडफडून मृत्यू झाला तर भारत तेथून तात्काळ पसार झाला. 

मात्र, काही क्षणात घडलेल्या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलीसांनी दुरध्वनीवरून दिली. त्यानंतर रूग्णवाहिकेतून श्रध्दाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हाशासकीय रूग्णालयात आणण्यात आला. तर पोलीसांनी श्‍वानपथकाला पाचारण करून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तसेच पोलीसांच्या सर्व विभागांची स्वतंत्र टिम तयार करून आरोपी भारत जाधवचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली.